पुण्यात चोरट्यांची दहशत; हडपसरमध्ये महिलेला चाकूच्या धाकाने लुटले
पुणे : राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता हडपसर येथील मगरपट्टा सिटीत ज्येष्ठ महिलेला चाकूच्या धाकाने लुटल्याची घटना घडली आहे. याबाबत ज्येष्ठ महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, दोन चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ महिला हडपसर भागातील भोसले गार्डन परिसरात राहायला आहेत. २२ जानेवारी रोजी त्या वानवडीतील कमांड हॉस्पिटलमध्ये निघाल्या होत्या. दुपारी तीनच्या सुमारास मगरपट्टा चौकातील उड्डाणपुलाजवळ त्या रिक्षाची वाट पाहत थांबल्या होत्या. परिसरातील महादेव मंदिराजवळ दोन चोरट्यांनी त्यांना अडवले, चाकूचा धाक दाखविला. त्यांच्याकडील ४२ हजारांचे सोन्याचे दागिने आणि पैसे ठेवलेले पाकिट असा मुद्देमाल लुटून चोरटे पसार झाले.
दरम्यान घटनेनंतर घाबरलेल्या महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असून, पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे अधिक तपास करत आहेत.
हे सुद्धा वाचा : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग; आई अन् भावावर कोयत्याने सपासप वार
महिलेच्या गळयातील मंगळसूत्र लांबवले
राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत आहेत. अशातचं आता कोयना वसाहत (ता. कराड) येथील कोयना वसाहत ते जखिणवाडी रस्त्यावर मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेच्या गळयातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरटयांनी धुम स्टाईल लांबवले आहे. शुक्रवारी (दि. १७) सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली आहे. याबाबत विजय दुर्गावळे यांनी शहर शहर पोलीस ठाण्यात दाखल केली.
पुण्यात पुन्हा तेच चोरटे ॲक्टीव्ह?
पुण्यातही सहा वर्षांपुर्वी सोनसाखळी चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला होता. दिवसाला तीन ते चार सोनसाखळी चोरीच्या घटना घडत असत. पादचारी महिला तसेच ज्येष्ठ महिला या चोरट्यांच्या टार्गेटवर असत. तीन राज्यात या टोळ्यांनी मोठा गोंधळ घातला होता. पुणे पोलिसांनी तीन राज्यातील माहिती एकत्रित करून या चोरट्यांचा माग सुरू केला होता. नंतर यातील काही टोळ्यांना पकडण्यात यश देखील आले होते. त्यांच्यावर मोक्कासारखी कारवाई देखील केली होती. नंतर या घटना थांबल्या होत्या. परंतु, आता पुन्हा सहा वर्षांनी सोन साखळी टोळ्या ॲक्टीव्ह झाल्याचे गेल्या काही महिन्यांपासून दिसत आहे. त्यामुळे पुन्हा तेच चोरटे ॲक्टीव्ह झाले आहेत का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.