
एका उसनवारीच्या वादातून घडलेल्या क्रूर कृत्याचा पोलिसांनी असा लावला छडा (Photo Credit - X)
चार लाख किमतीचे सोन्याचे दागिने लंपास
तुळजापूर तालुक्याच्या जळकोट येथील सुभद्रा रामशेट्टी पाटील या महिलेचा तीच्या राहत्या घरी अज्ञात व्यक्तीने गळा आवळून खून केला होता. तीच्या अंगावरील तब्बल चार लाख किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले होते. या प्रकरणी नळदुर्ग (ता. तुळजापूर) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्ह्याचे आव्हान लक्षात घेत पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडे याचा तपास दिला होता.
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार यांनी घटनास्थळी जाऊन सर्व बाजूंनी तपास सुरू केला होता. दरम्यान, त्यांना मिळालेल्या तांत्रिक माहितीतून घटनास्थळी एक महिला सातत्याने आणि संशयास्पद फिरत असल्याचे त्यांना आढळून आले. तीच्या बाबत केलेल्या अधिक चौकशीतून याच परिसरात राहणारी वनिता झुंबर सुरवसे ही त्या महिलेची ओळख निघाली. तीच्या मुलाकडे तीच्या बद्दल विचारणा केली असता, ती पुण्याला गेल्याचे समजले. लगेच एक पथक पुण्याला रवाना करण्यात आले. तीथे ती भिगवण येथील तीच्या मुलीकडे ती आढळून आली.
तीने पोलिसांना या खुनाची कबुली दिली असून दागिने गहाण ठेऊन मयत वृद्धेकडून तीने ४० हजार रुपये उसने घेतले होते. या रकमेसाठी वृद्धेकडून सारखा तगादा होता. यामुळे चिडलेल्या वनिताने त्या वृद्धेचा शुक्रवारी मध्यरात्री गळा आवळून खून करत वृद्धेच्या अंगावरील दागिने घेऊन पोबारा केला होता. दरम्यान पुढील तपासासाठी वनिताला नळदुर्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या खून प्रकरणातील आरोपीचा पोलिसांनी केवळ दोन दिवसात छडा लावला असून लोकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.