माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह चार आमदारांना मारण्याची धमकी; 'तो' फोन आला अन्... (फोटो - सोशल मीडिया)
नांदेड : राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्यासह नांदेड जिल्ह्यातील चार आमदारांना उडवून देण्याची धमकी देणारा फोन आला होता. यात एका व्यापाऱ्याकडे एक लाख रुपयांची खंडणीही मागितल्याचा प्रकार समोर आला. अशाप्रकारे धमकी देणाऱ्या आरोपीला नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुंबईतून अटक केली. पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास आता सुरु करण्यात आला आहे.
रवी ऊर्फ रविंद्र गौतम रोकडे (वय ३९) असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी महेश तुतारे (वय ३३) यांची आरोपीशी जुनी ओळख होती. गेल्या काही दिवसांपासून तो त्यांच्याकडे पैशांची मागणी करून धमकावत होता. १४ नोव्हेंबर रोजी फोन करून त्याने एक लाख रुपयांची खंडणी मागितली. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर, तीन वर्षांपूर्वी कारेगाव येथे अशोकराव चव्हाण आणि नांदेडमधील चार आमदारांना एकाच दिवशी उडवण्याचा कट आखल्याची धमकी त्याने दिली. तसेच आपल्या पाठीशी मोठ्या लोकांचे पाठबळ असल्याचेही सांगितले.
दरम्यान, याप्रकरणी वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्राथमिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याला वजीराबाद पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून, न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. धमकीमागील हेतू आणि अन्य कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे.
आरोपीला मुंबईतून घेतले ताब्यात
पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आरोपीच्या शोधात रवाना झाले. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी मुंबईतील गावदेवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याचे निष्पन्न झाले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने पेडर रोडवरील भारतीय चित्रपट राष्ट्रीय संग्रहालयातून त्याला ताब्यात घेण्यात आले.
FAQ
1. अशोक चव्हाण यांना कोणी जीवे मारण्याची धमकी दिली?
रवी ऊर्फ रविंद्र गौतम रोकडे (वय ३९) याने धमकी दिल्याचा आरोप आहे.
2. धमकी कोणाला देण्यात आली होती?
माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण आणि नांदेड जिल्ह्यातील चार आमदारांना धमकी देण्यात आली होती.
3. व्यापाऱ्याकडे किती रुपयांची खंडणी मागण्यात आली?
व्यापारी महेश तुतारे यांच्याकडे एक लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली.






