भाजपमध्ये आणखी एका नेत्याचा प्रवेश; सांगलीच्या विट्यात आता पक्षाची वाढणार ताकद
पुणे : पुणे महापालिकेतील एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्याला मानसिक त्रास देत सातत्याने छळ केल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीच्या कामगार आघाडीचे पुणे शहराध्यक्ष ओंकार कदम यांच्यावर करण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधित महिला अधिकाऱ्याने थेट महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली असून, महापालिकेच्या अंतर्गत तक्रार समितीकडेही धाव घेतली आहे. तक्रारीनंतर महापालिका प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, आयुक्त नवल किशोर राम यांनी ओंकार कदम व अक्षय कांबळे या दोघांना महापालिकेत पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदीचा आदेश दिला आहे.
महिला अधिकाऱ्याच्या आरोपानुसार, गेल्या पाच महिन्यांपासून भाजप पदाधिकाऱ्यांकडून सातत्याने छळ होत होता. त्यांच्या दालनात जबरदस्तीने प्रवेश करून छायाचित्रण करणे, दरवाजा बंद करून दमदाटी करणे, अपमानास्पद भाषा वापरणे असे प्रकार सुरू होते. याबाबत तक्रारी करूनही भाजप नेत्यांनी कोणतीही दखल घेतली नव्हती.
महापालिकेने दिलेल्या परिपत्रकानुसार, १७ फेब्रुवारी २०२५ रोजी काही कार्यकर्त्यांनी महिला अधिकाऱ्यांच्या कार्यकक्षात घुसून गोंधळ घातल्याची, तसेच “कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, प्रतिबंधन व प्रतितोष)” कायदा २०१३ अंतर्गत प्रकार घडल्याची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, ओंकार कदम यांनी पत्रकार परिषदेत आपल्यावरील आरोप फेटाळले. “कोणत्याही महिला अधिकाऱ्याला त्रास दिलेला नाही. केवळ माहिती अधिकारात विचारलेल्या माहितीमुळे ही तक्रार करण्यात आली आहे. तरी चौकशीत दोषी आढळल्यास पक्षाच्या पदाचा राजीनामा देईन,” असे त्यांनी स्पष्ट केले. हे प्रकरण आता राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ निर्माण करत असून, संबंधित तक्रारीची चौकशी सुरू आहे.