
पुण्यातील महापालिका भवनजवळ दोघांना लुटले, मारहाणही केली अन्...
पुणे : पुण्यातील महापालिका भवन परिसरात पीएमपी बसची वाट पाहत थांबलेल्या दोघांना रिक्षाचालक आणि साथीदाराने लुटल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रिक्षाचालकासह साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाबत जितेंद्रकुमार बाबूलाल (वय २९, सध्या रा. सूस गाव, पाषाण-सूस लिंक रस्ता) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, बाबूलाल आणि त्याचा मेहुणा मजुरी करतात. दोघे जण शनिवारी सकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास छत्रपती शिवाजी पुलावर पीएमपी बसची वाट पाहत थांबले होते. त्या वेळी रिक्षाचालक आणि साथीदार तेथे आले. रिक्षाचालकाने कुठे जायचे आहे, अशी विचारणा केली. त्यानंतर जितेंद्रकुमार आणि त्याचा मेहुण्याला मारहाण करुन रिक्षाचालक आणि साथीदारांनी दोघांकडील १४०० रुपये काढून घेतले.
जितेंद्रकुमारला धमकावून त्याला ऑनलाइन पद्धतीने एक हजार रुपये जमा करण्यास सांगितले. रिक्षाचालक आणि साथीदार तेथून पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत. शहरात गेल्या काही दिवसांपासून पादचाऱ्यांना लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पादचाऱ्यांना धमकावून त्यांचे मोबाइल आणि रोकड चोरून नेण्याच्या घटना वारंवार घडतात.
हे सुद्धा वाचा : पुण्यात घरफोडी करणारा अल्पवयीन ताब्यात; तब्बल लाखोंचा मुद्देमाल जप्त
राज्यात चोरट्यांचा धुमाकूळ
राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत आहेत. अशातचं आता कोयना वसाहत (ता. कराड) येथील कोयना वसाहत ते जखिणवाडी रस्त्यावर मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेच्या गळयातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरटयांनी धुम स्टाईल लांबवले आहे. शुक्रवारी (दि. १७) सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली आहे. याबाबत विजय दुर्गावळे यांनी शहर शहर पोलीस ठाण्यात दाखल केली.
पुण्यात पुन्हा तेच चोरटे ॲक्टीव्ह?
पुण्यातही सहा वर्षांपुर्वी सोनसाखळी चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला होता. दिवसाला तीन ते चार सोनसाखळी चोरीच्या घटना घडत असत. पादचारी महिला तसेच ज्येष्ठ महिला या चोरट्यांच्या टार्गेटवर असत. तीन राज्यात या टोळ्यांनी मोठा गोंधळ घातला होता. पुणे पोलिसांनी तीन राज्यातील माहिती एकत्रित करून या चोरट्यांचा माग सुरू केला होता. नंतर यातील काही टोळ्यांना पकडण्यात यश देखील आले होते. त्यांच्यावर मोक्कासारखी कारवाई देखील केली होती. नंतर या घटना थांबल्या होत्या. परंतु, आता पुन्हा सहा वर्षांनी सोन साखळी टोळ्या ॲक्टीव्ह झाल्याचे गेल्या काही महिन्यांपासून दिसत आहे. त्यामुळे पुन्हा तेच चोरटे ॲक्टीव्ह झाले आहेत का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.