महिलेच्या माध्यमातून डॉक्टरला अडकवण्याचा होता डाव; एक कोटीची खंडणी मागितली, पोलिसांना माहिती मिळताच...
शिरवळ / जीवन सोनवणे : शिरवळ येथे पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत महिलेच्या माध्यमातून एका डॉक्टरला अडकवत त्यांच्याकडून तब्बल एक कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोघा युवकांना रंगेहात पकडले. शिरवळ पोलिसांनी सापळा रचत ही कारवाई केली. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका प्रतिष्ठित डॉक्टरला काही दिवसांपूर्वी एका महिलेच्या माध्यमातून जाळ्यात ओढण्यात आले. या महिलेच्या मदतीने संबंधित युवकांनी डॉक्टरला अडचणीत आणण्याची योजना आखली. त्यानंतर खोट्या आरोपांच्या भीतीने डॉक्टरकडून एक कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली. डॉक्टरने धैर्य दाखवत थेट शिरवळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला आणि योजनाबद्ध पद्धतीने आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला.
फलटण पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल धस आणि शिरवळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किर्ती म्हस्के व त्यांच्या पथकाने व्यूहरचना आखून आरोपींना अटक केली.
खंडणीची रक्कम स्वीकारण्यासाठी दोघेजण आले अन्…
डॉक्टरकडून खंडणीची रक्कम स्वीकारण्यासाठी दोघेजण ठरलेल्या ठिकाणी आले, तेव्हा आधीच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून पुरावेही जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यासाठी चौकशी सुरू असून, यांसारख्या गुन्ह्यांमध्ये कोणते मोठे रॅकेट कार्यरत आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.
माजी नगरसेवकाकडे मागितली खंडणी
तर दुसऱ्या एका घटनेत, बदलापुरातील एका माजी नगरसेवकाकडे 50 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फिर्यादी माजी नगरसेवकाला एका महिलेसोबतचे अश्लील फोटो पाठवून आरोपींनी 50 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. खंडणी न दिल्यास महिलेसोबतचे अश्लील फोटो, व्हिडिओ कुटुंबियांना आणि नातेवाईकांना पाठवून बदनामी करू, अशी धमकी आरोपींनी माजी नगरसेवकाला दिली होती. या प्रकरणी माजी नगरसेवकाच्या फिर्यादीवरून बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.