६ दिवसांच्या पोटच्या मुलीला विकायला काढलं, किंमत ठरली 90000 रुपये (फोटो सौजन्य-X)
Ulhasnagar Crime News Marathi : उल्हासनगर शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जन्मजात बाळाची 90 हजार रुपयांना विक्री करण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याचे कारण पुढे करत बाळाच्या आई वडिलांनी हे निंदनीय कृत्य केलं आहे, आता ह्या प्रकरणी बाळाच्या आजीने दिलेल्या तक्रारीवरून उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात बाळाचे आई- वडील आणि मध्यस्थी महिला तसेच बाळ खरेदी करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उल्हासनगर कॅम्प नंबर ४ येथील मराठा सेक्शन परिसरात तक्रारदार विजया गायकवाड राहतात, त्यांना दोन मुलं असून त्यापैकी विशाल हा मोठा मुलगा आहे, विशाल च्या पत्नीने 22 जानेवारी रोजी उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात मुलीला जन्म दिला. ही माहिती विशाल ने आपल्या आईला दिली. विशाल ची आई 25 जानेवारी रोजी बाळाला पाहण्यासाठी रुग्णालयात आली असता बाळ 90 हजार रुपयांना विक्री झाल्याचं मुलाने सांगितले.
पुन्हा ते बाळ मिळवावे यासाठी बाळाच्या आजीने प्रयत्न सुरू केले, घेतलेले पैसे परत करून बाळ परत घेऊन ये असे विशालला सांगितले. दरम्यान हे बाळ मध्यस्थी महिलांच्या प्रयत्नाने शेख कुटुंबियांना विक्री केल्याचे सांगितले. अखेर आजीच्या तक्रारी वरून उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात बाळाचे आई-वडील, मध्यस्थी महिला आणि खरेदी करणारे शेख कुटुंबिय यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तात्काळ सर्वांना बेड्या ठोकल्या आहेत. तर पुढील तपास मध्यवर्ती पोलीस करत आहेत.
दरम्यान उल्हासनगरमध्ये मराठा सेक्शन बौध्द विहाराजवळ राहणारी बाळाची आजी विजया यांना विशाल, सुजाताने नवजात बालिकेची विक्री केल्याची कुणकुण लागताच विजय गायकवाड यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार केली. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, एक नवजात बाळाची विक्री करण्याच्या प्रकरणात एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. नवजात बाळ, त्याची आई सुजाता रुग्णालयात सुखरूप आहेत. विक्री केलेले बाळ बाळ संरक्षण व संगोपन केंद्राकडे योग्य त्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सोपविण्यात येणार आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आशा निकम तपास करत आहेत.