crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेश येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका मेंढपाळाने २० दिवसांच्या चिमुकलीला वाचवल्याचे समोर आले आहे. या चिमुकलीला चिखलात गाडलं गेलं होत. त्यामुळे तिच्या नाकात आणि तोंडात माती गेली होती. म्हणून तीला स्वास घेणे हे कठीण झाले आहे. मेंढपाळाला मातीतून चिमुकलीचा रडण्याचा आवाज ऐकू आल्याने त्याने आवाजाच्या दिशेने पाहिल्यावर त्याला मातीतून बाहेर आलेला बाळाचा हात दिसला. तेव्हा हे प्रकरण समोर आलं.
नेमकं काय घडलं?
ही घटना शहाजहानपूर जिल्ह्यातील एका गावात घडली आहे. मेंढ्या चरायला गेलेल्या मेंढपाळाला मातीतून बालकाचा रडण्याचा आवाज ऐकू आला. आवाजाच्या दिशेने पाहिल्यावर त्याला मातीतून बाहेर आलेला एका बाळाचा लहानसा हात दिसला. क्षणाचाही विलंब न करता त्याने गावकऱ्यांना आणि पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चिखलाखाली गाडलेलं बालक बाहेर काढलं. ते बाळ अवघ्या 20 दिवसांची मुलगी होती.
श्वसनाचा त्रास होत होता
बाहेर काढल्यानंतर तातडीने सरकारी रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कुमार यांनी सांगितले की, बाळ अत्यंत गंभीर अवस्थेत दाखल झाले होते. तिच्या तोंडात आणि नाकात चिखल भरलेला होता, शरीर घाणीने माखलेलं होतं. श्वसनाचा त्रास, ऑक्सिजनची पातळी घटलेली आणि किड्यांनी व प्राण्यांनी घेतलेल्या चाव्यांच्या खुणा दिसत होत्या.डॉ. कुमार यांनी पुढे सांगितले की, हे बाळ पुरल्यानंतर लगेचच सापडलं असावं. तिच्या जखमा अजून ताज्या होत्या. सध्या प्लास्टिक सर्जनसह तज्ज्ञ डॉक्टरांचा ताफा तिच्यावर उपचार करत आहे. संसर्गावर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पोलीस तपास सुरु
पोलिसांनी या चिमुकलीचे पालक शोधण्यास सुरुवात केली असून, चाइल्ड हेल्पलाइनलाही या घटनेची माहिती देण्यात आली आहे. कोणत्या कारणाने असं करण्यात आलं याचा देखील शोध पोलीस करत आहे.
दरम्यान, ही उत्तर प्रदेशमधून समोर येणारी पहिलीच घटना नाही. यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या आहेत, जिथे केवळ ‘मुलगी झाली’ म्हणून नवजात बालिकांवर अमानुष प्रकार करण्यात आले. काहींना रस्त्याच्या कडेला टाकलं गेलं, काहींना विहिरीत फेकलं गेलं, तर काहींना जिवंत पुरण्यात आलं. हे प्रकार केवळ मानवी संवेदनेलाच नाही, तर संपूर्ण समाजव्यवस्थेलाच हादरवून टाकणारे आहेत.