
crime (फोटो सौजन्य: social media)
छत्रपती संभाजीनगर : वाळूजनजीक असलेल्या मुरमीत घरातच एका १७ वर्षीय मुलीचा गळा चिरलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. या खुनामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. खून की आत्महत्या याविषयीही तर्कवितर्क लढविले जात होते. अखेर वाळूज पोलिसांनी अवघ्या 24 तासांत या घटनेचा उलगडा केला असून, आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. यातील आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला २६ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
वाळूज लगत असलेल्या मुरमी येथे वैष्णवी संतोष निळ ही १७ वर्षाची विद्यार्थीनी घरात मृत अवस्थेत आढळून आली. तिचे आई-वडील हे दोघेही शेतात गेले होते. वैष्णवी ही वाळूजच्या एका विद्यालयातील बारावी वर्गात शिक्षण घेत होती. तिच्या गळ्यावर जखम आढळून आल्याने तर्क-वितर्क लढविले जात होते. वैष्णवीने आत्महत्या केली की खून झाला याचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे होते. या घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवचरण पांढरे घटनास्थळी दाखल झाले.
हेदेखील वाचा : Rajasthan Crime : बाप बनला नराधम ! रागावून माहेरी गेलेली पत्नी परत यावी म्हणून ९ वर्षांच्या चिमुकलीची हत्या
यावेळी पोलिसांनी फॉरेन्सिक टीम तसेच श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. तिच्या घरासह परिसरातील पुरावे बारकाईने तपासले गेले. घटनेची गंभीरता लक्षात घेता मुरमी गावात रात्रीपासून कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गावात सतत गस्त सुरू असून, परिस्थितीवर पोलिसांची बारकाईने नजर आहे. घरात घुसून अल्पवयीन मुलीचा निर्घृण आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे. गावातील मुलींच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने अधिक कडक उपाययोजना कराव्यात.
आरोपीकडून गुन्ह्याची कबुली
सूत्रांच्या माहितीनुसार, मुरमी परिसरातच राहणाऱ्या नानासाहेब मोरे याच्यासोबत मृत वैष्णवीची ओळख होती. अनेक दिवसांपासून त्यांची मैत्री असल्याने नानासाहेबचे येणे-जाणे होते. घटनेच्या दिवशी नानासाहेब याच्याशी पैशाच्या व्यवहारावरून वैष्णवीचा वाद झाला असे तांत्रिक तपासात आढळून आले. पोलिसांनी तात्काळ नानासाहेब याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसांच्या उलट सुलट प्रश्नापुढे त्यांची बोलती बंद झाली अन त्याने गुन्ह्याची कबूली दिली.