
पुण्यात डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण; टिळक रस्त्यावर हल्ला
पुणे : डीजेविरोधात आवाज उठवणारे विद्यानंद बापट सध्या महाराष्ट्रभर चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. कोणताही आक्रस्ताळेपणा न करता, कायद्याच्या आणि संविधानाच्या चौकटीत राहून त्यांनी मांडलेली रोखठोक मते, तार्किक विचार आणि त्यांची अस्खलित, शुद्ध मराठी भाषण शैली यामुळे ते सध्या सोशल मीडियावर तुफान ट्रेंडिंग आहेत. आजही याच विषयावर ते एका माध्यम संस्थेला बोलत असताना काही तरुणांना त्यांना मारहाण करण्याचा प्रकार घडला. डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या बापट यांना मारहाण झाल्याने पुण्यात खळबळ उडाली आहे.
विद्यानंद बापट हे एका वृत्त संस्थेला मुलाखत देत असताना त्यांना तरुणांकडून मारहाण झाली. टिळक रस्त्यावर रस्त्यावरील काही तरूणांनी त्यांना मारहाण केली. आमच्या गणेशोत्सवाला तू विरोध करतो, असा तरुणांचा आक्षेप होता. या घटनेनंतर पोलीस तक्रार देण्याची विद्यानंद बापट यांची तयारी सुरू आहे.
विद्याधर बापट नारायण पेठेतील रहिवासी आणि पर्यावरणप्रेमी नागरिक आहेत. गणेशोत्सवातील डीजेच्या मोठ्या आवाजाला विरोध केल्यामुळे विद्यानंद बापट सध्या चर्चेत आले आहेत. याचदरम्यान, आज विद्यानंद बापट यांना मारहाण झाली आहे. विद्यानंद बापट यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे धार्मिक संघटना, डीजेप्रेमी आणि ढोलवादक पथकातील अनेकजण नाराज झाले होते. विद्यानंद बापट यांनी यापूर्वी पुणे महानगरपालिकेच्या सभेत डीजेला विरोध केला होता. तेव्हाही गणेश मंडळांचे प्रतिनिधी आणि राजकीय व्यक्तींनी बापट यांना विरोध केला होता. तेव्हादेखील बापट यांना पालिकेच्या सुरक्षारक्षकांनी बंदोबस्तात बाहेर काढले होते. मात्र, आता विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला झाला आहे. त्यांना मारहाण करण्यात आली आहे.
विद्यानंद बापट यांच्यामागे कोणताही राजकीय, सामाजिक असा मोठा परिचय नाही. विद्यानंद सामान्य कुटुंबातील सामान्य व्यक्तिमत्व आहेत. विद्यानंद बापट हे 37 वर्षीय असून ते बीपीओ क्षेत्रात काम करतात. त्यांचं बहुतांश काम हे घरातूनच सुरू असतं. मुळचे रत्नागिरीचे असलेले विद्यानंद बापट गेल्या 8 वर्षांपासून पुण्यातील नारायण पेठ येथे राहत आहेत. विद्यानंद बापट यांनी मुंबई विद्यापिठातून वाणिज्य शाखेची पदवी घेतली असून पुण्यातील पुरोगामी संघटनांच्या विविध उपक्रमांमध्ये ते सक्रियपणे सहभागी होत असतात.
हे सुद्धा वाचा : अनैतिक संबंधातून वाद, महिलेचा भरदिवसा खून; पन्हाळा तालुक्यातील घटनेनं खळबळ