Raja Raghuvanshi Case: हनिमूनसाठी मेघालयला गेलेल्या इंदूर येथील राजा रघुवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. राजाचा मृतदेह सापडल्यानंतर बराच काळ बेपत्ता असलेली त्यांची पत्नी सोनम हिला उत्तर प्रदेशातील गाजीपूर येथून अटक करण्यात आली आहे. सोनमसोबत आणखी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यामध्ये दोघे आरोपी मध्यप्रदेशातील तर एक उत्तरप्रदेशातील आहे. अद्याप एक आरोपी फरार असून, त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
राजा रघुवंशी यांचा मृतदेह आढळल्यानंतर त्यांच्या कुटुंबाने सोनमवर संशय व्यक्त केला होता. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, सोनमनेच स्वतः घरी परतण्याची विनंती करत संपर्क केला होता. त्यानंतर त्यांनी इंदूर पोलिसांना माहिती दिली, आणि पोलिसांनी कारवाई करत सोनमला गाजीपूरमधून ताब्यात घेतले. पोलिस या प्रकरणाचा तपशीलवार तपास करत असून, हत्येमागील कारण आणि कटातील इतर दोषींविषयी माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मेघालयचे पोलीस महासंचालक (DGP) आय. नोंगरांग यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदूर येथील राजा रघुवंशी यांच्या हत्येप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी एक महत्त्वाचा पुरावा म्हणून मावलाखियात गावातील एका स्थानिक पर्यटक मार्गदर्शकाने दावा केला होता की, २३ मे रोजी बेपत्ता होण्याआधी राजा आणि त्याची पत्नी सोनम यांच्यासोबत तीन अज्ञात पुरुष होते. या साक्षीमुळे तपासाला एक नवे वळण मिळाले आहे. २ जून रोजी राजा रघुवंशी याचा मृतदेह खोल दरीत सापडला, तर त्याची पत्नी सोनम अद्याप बेपत्ता होती. त्यामुळे सोनमसोबत असलेले हे तिघे पुरुष नेमके कोण होते, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड के. संगमा यांनी ट्विटद्वारे माहिती दिली की, “इंदूर राजा हत्या प्रकरणात मेघालय पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. मध्य प्रदेशातील तीन हल्लेखोरांना अटक करण्यात आली असून, संबंधित महिलेला आत्मसमर्पण करण्यास भाग पाडण्यात आले आहे. आणखी एका आरोपीचा शोध सुरू आहे.”
स्थानिक पर्यटक मार्गदर्शक अल्बर्ट पी.डी. यांनी सांगितले की, २३ मे रोजी सकाळी १० वाजता त्यांनी मावलाखियात परिसरात हे जोडपे तीन पुरुषांसह शेवटचे पाहिले होते. ते चौघेही नोंगरियातहून ३,००० पेक्षा अधिक पायऱ्या चढत मावलाखियातकडे येत होते. माझी त्यांच्याशी आधी चर्चा झाली होती, पण त्यांनी दुसऱ्या मार्गदर्शकाची सेवा स्वीकारली. त्या वेळी चार पुरुष पुढे चालत होते आणि ती महिला थोडी मागे होती. ते सर्व हिंदीत बोलत होते, पण मला फक्त खासी आणि इंग्रजी भाषा येते, त्यामुळे त्यांचे बोलणे समजले नाही, असे त्यांनी सांगितले.