विवाहबाह्य संबंधांतून गरवारेजवळ तरुणाचा खून
इंदिरानगर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यातच इंदिरानगर पोलिस ठाणे हद्दीत शनिवारी (दि. १३) रात्री उशीरा खुनाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, मृताच्या पत्नीच्या विवाहबाह्य संबंधातून हा प्रकार घडला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. संतोष उर्फ छोटू काळे (वय ३८, रा. वसाहत क्र. १, लेखानगर) असे मृताचे नाव आहे.
आरोपी पत्नी पार्वती काळे हिचा प्रियकर प्रफुल्ल कांबळे यांनी संतोष याचा खून केल्यानंतर तो अहिल्यानगर येथे पळाला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी अहिल्यानगर पोलिसांच्या मदतीने संशयित कांबळे याला ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष याचे वडील अशोक काळे (वय ५५, रा. इंदिरा गांधी वसाहत, शिवाजी चौक) यांनी फिर्याद दिली. संतोष रात्रभर घरी परातला नव्हता. तर त्याची पत्नी पार्वती हिनेदेखील तो परतला नसल्याबाबत सासण्यांना कळवले होते.
संतोष काळे याला मोठ्या प्रमाणावर मद्य प्राशन करायची सवय असल्याने तो मद्य प्राशन केल्यावर परिसरात उघड्यावर कोठेही नशेत झोपून जात असे. संतोष काळे नेहमीप्रमाणे कामकाज करून रात्री झोपी गेले. मात्र, संतोष रात्रभर घरी न परतल्याने पहाटेच्या सुमारास परिसरात शोधाशोध केली. पण तो मिळून न आल्याने त्यांनी नातलगांसह पोलीस ठाणे गाठले.
सीसीटीव्हीच्या आधारे तपास
यावेळी इंदिरानगर पोलिसात गेल्यानंतर गरवारे येथे एका अनोळखी इसमाचा मृतदेह मिळून आला असल्याची माहिती मिळताच फिर्यादी यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्यावेळी तो फिर्यादी यांचा मुलगा संतोषच असल्याचे निष्पन्न झाले. पार्वती काळे ही भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करते. तसेच संतोष हा बिगारी काम करत होता. दरम्यान, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजसह इतर पुरावे तपासले जात आहेत. तर घटनास्थळावर फॉरेन्सिक टीम पाचारण करण्यात आली होती.
पत्नीसह तिच्या प्रियकरावर खुनाचा गुन्हा दाखल
याबाबत मयत संतोष काळे यांच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मयत संतोषची पत्नी संशयित पार्वती व तिचा प्रियकर प्रफुल्ल कांबळे यांसह अन्य दोन साथीदारांवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.