महिलेने सराफाला घरी बोलावले, नंतर नवरा आला अन्...; पुढे जे घडलं ते वाचून हादरून जाल
अकोला : राज्यासह देशभरात फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. दररोज वेगवेगळ्या भागात आमिषे दाखवून चोरटे नागरिकांच्या लाखो रुपयांवर डल्ला मारत आहेत. फसवणुकीच्या घटनांपासून सावध राहण्यासाठी पोलिसही वेळोवेळी आवाहन करत असले तरीही नागरिक फसवणुकीला बळी पडत आहेत. अशातच आता अकोला जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अकोला जिल्ह्यातील मूर्तीजापूर तालुक्यात एका 52 वर्षीय सराफा व्यावसायिकाला खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवत त्याची तब्बल 18 लाख 74 हजार रुपयांची लूट केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अकोला शहरातील रहिवासी असलेले फिर्यादी 16 जून रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेत पैसे जमा करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांची ओळख मूर्तीजापूर तालुक्यातील खरब ढोरे गावातील लता नितेश थोप या महिलेशी झाली. या ओळखीच्या माध्यमातून तिने फिर्यादीचा मोबाईल क्रमांक मिळवला व त्यांच्याशी वारंवार संपर्क साधू लागली. काही दिवसांनी 2 जुलै रोजी लताने पती घरी नसल्याचे सांगत फिर्यादीला आपल्या घरी बोलावले. फिर्यादी दुपारी 12 वाजता तिच्या घरी पोहोचले असता, अचानक तिचा पती नितेश प्रभाकर थोप तिथे येऊन पोहोचला आणि त्याने त्या दोघांचे फोटो काढण्यास सुरुवात केली. यानंतर, या दाम्पत्याने फिर्यादीस बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. तसेच, हे फोटो समाजात व नातेवाईकांमध्ये प्रसारित करण्याची भीती दाखवून सुरुवातीला 3 लाख रुपयांची मागणी केली.
फिर्यादीने भीतीपोटी त्यावेळी तीन लाख रुपये दिले. मात्र त्यानंतरही वेळोवेळी धमक्या देत, या जोडप्याने आणखी रक्कम उकळत एकूण 18 लाख 74 हजार रुपये वसूल केले. तरीही आरोपी थांबले नाहीत. त्यांनी पुन्हा एकदा 5 लाख रुपयांची मागणी केली. यावेळी मात्र फिर्यादीने मूर्तीजापूर ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दाखल केली. फिर्यादीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी तातडीने सापळा रचला आणि मूर्तीजापूर-अकोला रोडवरील टोल नाक्यावर, आरोपींना पैसे घेताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी लता नितेश थोप व नितेश प्रभाकर थोप या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऑनलाइन ट्रेडिंगच्या आमिषाने सव्वा तीन लाखांची फसवणूक
ऑनलाइन ट्रेडिंग आणि हॉटेल रेटिंगच्या नावाखाली नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून धायरीतील एका व्यक्तीची सव्वा तीन लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी नांदेडसिटी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याबाबत ४० वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. ही फसवणूक २६ मे २०२५ ते सात जून २०२५ या कालावधीत झाली.