लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर सातत्याने अत्याचार; पीडितेला मुलगी होताच...
हिंगोली : लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेवर अत्याचार केल्याची घटना हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, पीडित महिलेस मुलगी झाल्यानंतर आरोपीने तिच्याकडे दुर्लक्ष करत तिला व तिच्या मुलीला सांभाळण्यास नकार दिला. त्यानंतर पीडितेने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करताच, पोलिसांनी आरोपीला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला रोजमजूरी करून आपला उदरनिर्वाह करते. तिच्या कुटुंबात कोणीही जवळचे नसल्याने तिच्या असहायतेचा गैरफायदा घेत फरदीन पठाण या तरुणाने तिला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले. या संबंधातून महिला गर्भवती राहिली. त्यावेळी फरदीनने तिला लग्न करून जबाबदारी स्वीकारण्याचे आश्वासन दिले. मात्र, महिलेस मुलगी झाल्यानंतर फरदीनने तिच्याशी संपर्क टाळण्यास सुरुवात केली. जेव्हा महिलेस लग्नासाठी आग्रह धरला, तेव्हा त्याने तिला मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिली.
हेदेखील वाचा : Nilesh Chavan Arrest: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील निलेश चव्हाणला पोलीस कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?
अखेर, पीडित महिला आपल्या चिमुकल्या मुलीसह थेट हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात पोहोचली आणि तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी फरदीन पठाण याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस उपअधीक्षक आंबादास भुसारे, पोलिस निरीक्षक शामराव डोंगरे, उपनिरीक्षक राहुल घुले यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी पोहोचले.
राजगुरुनगर येथे अल्पवयीन तरुणीवर अत्याचार
दुसऱ्या एका घटनेत, पुण्यातील राजगुरूनगर जवळील चांडोलीत अल्पवयीन तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलगी आचाऱ्याला आचारी कामात मदत करत होती. त्याच आचारीने मुलीसोबत अत्याचार केल्याचे समोर आलं आहे.