17 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह महिलेची पर्स चोरीला; एकाच कुटुंबातील तीन चोरांना अटक
नागपूर : इतवारी परिसरात दागिने विकण्यासाठी आलेल्या वृद्ध महिलेच्या पिशवीतून अज्ञात आरोपींनी 15.30 लाख रुपये किंमतीचे दागिने असलेली पर्स चोरून नेली. याबाबतची तक्रार मिळताच तहसील पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची फुटेज तपासून आरोपी निष्पन्न केले आणि एकाच कुटुंबातील 3 चोरांना बेड्या ठोकल्या. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीचा मालही जप्त केला.
आचल सुशील हातागडे (वय २०), सुशील सुनील हातागडे (वय २३) आणि मंजू सुनील हातागडे (वय २०, तिन्ही रा. रामटेकेनगर, टोली) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. फिर्यादी शाकेरा ताहेर गोहर (वय ६५, रा. हुसेनी मेंशन, महेशनगर) या गृहिणी आहेत. त्यांना त्यांच्याकडील जुने दागिने विकून नवीन दागिने बनवायचे होते. काही दिवसांपूर्वी दुपारी त्यांनी दोन पर्समध्ये दागिने ठेवले आणि इतवारीच्या कक्कड ज्वेलर्समध्ये गेल्या. दुकानात पोहोचल्यावर एक पर्स घरीच राहिल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्या एका पर्समध्ये असलेले १७० ग्रॅम सोन्याचे दागिने घेऊन परत घराकडे निघाल्या.
या दरम्यान शहीद चौकाजवळील मोदी राखी भंडारजवळ त्यांच्या हातातील पिशवी खाली पडली. या दरम्यान दुचाकीवर असलेले वरील तिन्ही आरोपी त्यांच्या मदतीला आले. त्यांनी पिशवी उचलून शाकेरा यांच्याकडे दिली आणि निघून गेले. शाकेरा पिशवी घेऊन पुढे निघाल्या. काही वेळाने त्यांच्या लक्षात आले की, पिशवीतील पर्स गायब आहे. तेव्हा त्यांना आपले दागिने चोरीला गेल्याचे समोर आले. त्यानंतर संबंधित महिलेला मोठा धक्का बसला.
पोलिसांत तक्रार देताच आरोपींना अटक
याप्रकरणाची तक्रार पोलिसांत देण्यात आली. पोलिसांनी याची गंभीर दखल घेत तपासाची चक्रे वेगाने फिरवली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची फुटेज तपासून आरोपी निष्पन्न केले आणि एकाच कुटुंबातील 3 चोरांना बेड्या ठोकल्या. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीचा मालही जप्त केला.
शोरूममध्ये घुसून कामगारानेच केली चोरी
दुसऱ्या एका घटनेत, वाकडेवाडीतील नामांकित दुचाकीच्या शोरुममधील सुरक्षारक्षकाला कटरचा धाक दाखवून व त्याचे हातपाय बांधून शोरुममधील ७ लाख ११ हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने लुटण्यात आली. दरम्यान, यातील चोरटा शोरूममधीलच कामगार निघाला आहे. त्याला गुन्हे शाखेच्या युनिट चारने बेड्या ठोकल्या आहेत. प्रतिक भारत सावंत (वय २३, रा. सुळे पीजी महर्षीनगर, गुलटेकडी) असे चोरट्याचे नाव आहे. त्यानंतर नागपुरात चोरीची घटना समोर आली आहे.