
काम मिळवून देतो म्हणत कलाकेंद्रातील तरुणीवर सामूहिक अत्याचार; मारहाणही केली
अंबाजोगाई : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय वाढत आहेत. असे असताना आता एका तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याचे समोर आले. नृत्याची आवड असलेल्या बारामती तालुक्यातील एका तरुणीला कलाकेंद्रात काम व पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून अंबाजोगाई येथे आणून तिच्यावर सामूहिक अत्याचार झाला.
कन्हेरी (ता. बारामती) येथील महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, तिच्या मुलीला नृत्य व गायनाची आवड होती. २४ एप्रिल रोजी अंबाजोगाई येथील बदामबाई गोकुळ हिने संपर्क साधून पायल कलाकेंद्रामध्ये नृत्यासाठी संधी व मोबदला मिळेल, असे सांगितले. विश्वास ठेवून मुलीला अंबाजोगाईला पाठवण्यात आले. मात्र, कलाकेंद्रात राहण्यास नकार दिल्याने बदामबाई व इतरांनी तिला मारहाण केली. यानंतर पीडितेला जबरदस्तीने अंबाजोगाईतील साई लॉजवर नेऊन मनोज कालिया, प्रमोद गायकवाड व एका अज्ञात व्यक्तीच्या ताब्यात देण्यात आले.
हेदेखील वाचा : एकतर्फी प्रेमातून तरूणीला त्रास; पाठलाग करत धमक्याही दिल्या, तरुणीने शहर सोडल्यानंतर…
दरम्यान, तेथे तिघांनी आळीपाळीने अत्याचार केल्याचा आरोप आहे. नंतर तिला पुन्हा कलाकेंद्रात आणून वेश्याव्यवसाय करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अत्याचारानंतर पीडितेने आईशी संपर्क साधताच आईने अंबाजोगाई गाठून मुलीची सुटका केली.
पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
अत्याचाराची तक्रार देण्यासाठी पीडितेची आई आधी अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात गेली होती. मात्र, तेथे गुन्हा नोंदवून न घेतल्याचा आरोप होत असून, अखेर बारामती येथे तक्रार दाखल केल्यानंतर कारवाई सुरू झाली. या प्रकरणात अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांच्या भूमिकेबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. सध्या याप्रकरणी पीडित तरुणीच्या आईच्या फिर्यादीवरून एका महिलेसह चौघांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
मोलकरणीची हत्या केली अन्…
दुसऱ्या एका घटनेत, उत्तरप्रदेश येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. मोलकरणीची हत्या तिच्या मालकानेच केल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर तिची हत्या करून सुटकेसमध्ये भरून शेतात फेकून दिल्याचे समोर आले आहे. पोलिसांना एका सुटकेसमध्ये तरुणीचा मृतदेह सापडला होता. तिची हत्या अनेक दिवसांपूर्वी करण्यात आल्याची समोर आले आहे. कारण, बॅगमध्ये मृतदेहाचा सांगाडा सापडला. त्यामुळे पोलिसांना या पीडितेची ओळख पटवणं खूप कठीण झालं होत. मात्र, पोलिसांनी या घटनेचा उलगडा केला आहे.