केवळ 2 हजार रुपयांसाठी कामगाराने जाळले मालकाचे दोन ट्रक; आधी दारू प्यायला अन् नंतर...
नागपूर : सध्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारखे गुन्हे घडताना दिसत आहे. त्यातच नागपुरात एक विचित्र प्रकार घडला. मालक पगार देण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे संतापलेल्या चालकाने पेट्रोल ओतून त्याचे दोन ट्रक पेटवून दिले. यामध्ये ट्रकचे मोठे नुकसान झाले.
आकाश टेकाम (वय 30, रा. बेलतरोडी) असे चालकाचे नाव आहे. याप्रकरणी इमामवाडा पोलिसांनी मालक सिदप्पा इरख्या सोरलोट (वय 37, रा. घाट रोड) तक्रारीवरून आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे पथक दोन बंबांसह घटनास्थळी पोहोचले आणि आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. मात्र, तोपर्यंत दोन्ही ट्रकचे केबिन पूर्णतः जळून खाक झाले होते.
सिदप्पाकडे एमएच-49/एटी-1845 आणि एमएच-49/0526 क्रमांकाचे दोन ट्रक आहेत. आकाश त्याच्याकडे चालक म्हणून कामाला होता. काही महिन्यांपूर्वी आकाशच्या निष्काळजीपणामुळे ट्रकला अपघात झाला होता. यात सिदप्पाचे 40 हजार रुपयांचे नुकसान झाले होते. त्यामुळे त्याला गेल्या 10 दिवसांपूर्वीच कामावरून काढले होते.
ट्रकमालक सिदप्पाने सांगितले की, आकाश हा व्यसनाच्या आहारी गेला होता. त्याला अनेकदा समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्यात सुधारणा होत नव्हती. शेवटी कंटाळून 10 दिवसांपूर्वी त्याला नोकरीवरून काढले. त्याने दुसऱ्या ठिकाणी कामही सुरू केले होते. त्यामुळे त्याला फोनही केला नाही. त्याचे काही पैसे थकित होते. पैशांसाठी तो फोन करत होता.
पगारातील दोन हजार मागितले अन्…
काही दिवसांपासून आकाश मालक सिदप्पाला पगाराचे 6 हजार रुपये मागत होता. मात्र, सिदप्पा अपघातात झालेल्या नुकसानीचे कारण पुढे करून त्याला शांत करत होता. तसेच त्याला नुकसान भरपाईची मागणी करत होता. सोमवारी आकाशने सिदप्पाला त्याच्या पगारातून 2 हजार रुपये मागितले. सिदप्पाने पैसे देण्यास नकार दिला. यामुळे आकाश नाराज झाला. त्याने दारू प्यायली आणि नंतर सिदप्पाचे दोन ट्रक उभे असलेल्या ठिकाणी गेला. त्यानंतर त्याने हे दोन्ही ट्रक पेटवून दिले.