पुणे : लिव्ह-ईनमध्ये राहणार्या तरुणाला तरुणीच्या भावाने घरात घुसून बेदम मारहाण केली. त्याला पट्टी तसेच वायरने मारहाण केल्याने मारहाणीत तरुणाच्या जबड्याचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी 28 वर्षीय आरोपी व त्याच्या तीन साथीदारावर भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गणेश बाळासाहेब कांबळे (वय 27, रा. त्रिमुर्ती चौक भारती विद्यापीठ) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना 28 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास त्रिमुर्ती चौक भारती विद्यापीठ परिसरात घडली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार कांबळे व यातील एका आरोपीची बहीण याच्यासोबत लिव्ह अॅण्ड रिलेशनमध्ये राहत होते. या गोष्टीचा राग मनात धरून त्याने आपल्या तीन साथीदारांसह कांबळे याच्या घरात घुसून मारहाण केली. लाथाबुक्याबरोबरच लाकडी पट्टी, वायरने मारहाण केली. दरम्यान कांबळे हा तेथून पळून जात असताना, देखील आरोपींनी त्याला बेदम मारहाण केली. त्यामध्ये कांबळे याच्या जबड्याचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. आरोपींनी कोणी मध्ये आले तर हात पाय मोडू असे म्हणून परिसरात दहशत निर्माण केल्याचे म्हटले आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक पाटील करीत आहेत.
पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले
पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. गेल्या काही दिवसाखाली येरवडा कारागृहातून बाहेर पडलेल्या मित्राला भेटण्यासाठी आलेल्या तरुणांना टोळक्याने अडवून मारहाण केल्याची घटना घडली आहे. टोळक्याने कारागृहासमोर दहशत माजविली. याप्रकरणी आठ जणांविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तसेच वानवडी परिसरात दोन दुचाकी चालकांमध्ये सुरू असलेले वाद सोडवण्यास गेलेल्या गणवेशधारी पोलीस अधिकाऱ्यावर गुंड तरुणांनी कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हातातून कोयता घेत असताना तो कोयता फेकून डोक्यात मारल्याने अधिकारी रक्तबंबाळ झाला. त्यानंतर कोयतेधारी दोन तरुण तेथून पसार देखील झाले. घटनेत पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाला. याघटनेने शहर पोलीस दलात खळबळ उडाली.