
माफी मागण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले अन् तरुणावर जीवघेणा हल्ला केला
पिंपरी : माफी मागण्याच्या बहाण्याने तरुणाला बोलावून घेऊन त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत एकाने त्याच्यावर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी (दि.२७) रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास काळेवाडी येथील पाचपीर चौक येथे घडली.
या प्रकरणात सुंदरम लालचंद यादव (२५, रहाटणी, पुणे) यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आशु मॅडम उर्फ ऐश्वर्या सुतार (आदिनाथ नगर, भोसरी, पुणे), तिचे पती कांतीलाल (आदिनाथ नगर, भोसरी, पुणे), ओमकार, सोहम, निखील, राज व इतर तरुणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी ऐश्वर्या सुतार हिला अटक करण्यात आली आहे.
एका लॉजिस्टिक फूड डिलिव्हरी कंपनीतील फील्ड मॅनेजर असलेल्या आरोपी ऐश्वर्या सुतार हिने फिर्यादींना फोन करून माफी मागण्याच्या बहाण्याने पाचपीर चौक येथे बोलावून घेतले. तिथे आरोपींनी फिर्यादींना लाथाबुक्क्यांनी व कमरेच्या पट्ट्याने मारहाण केली. तसेच ऐश्वर्या सुतार हिच्या सांगण्यावरून तिच्या सोबत असलेल्या आरोपी ओमकार याने कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यात, डाव्या हातावर व उजव्या कानाजवळ वार करून त्यांना गंभीर जखमी केले. काळेवाडी पोलीस तपास करत आहेत.
खंडणी न दिल्याने रचला हत्येचा डाव
अमली पदार्थ विक्रीप्रकरणातील आरोपीकडे ५० हजारांची खंडणी मागण्यात आली. मात्र, ही खंडणी न दिल्याने त्याची हत्या करण्याच्या उद्देशाने चाकू घेऊन निघालेल्या दोघांचा कळमना पोलिसांनी डाव उधळून लावला. ईदच्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर वाजपेयीनगर परिसरात तैनात असलेल्या पोलिसांच्या गस्ती पथकाला संशय आल्याने दोघांना पकडले. मात्र, ताब्यात घेताना आरोपींनी पोलिसांशी झटापट करत शिवीगाळ व धक्काबुक्की केली.
घाबरवण्यासाठी केला हवेत गोळीबार
दुसऱ्या एका घटनेत, बिअर बारमध्ये देशी दारूची विक्री होत असल्याचा व्हिडिओ काढल्याच्या वादातून तरुणांवर दहशत निर्माण करण्यासाठी हवेत गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात घडला. या प्रकरणी कोळ न्हावी गावाचा सरपंच विकास सोलंके याला यावल पोलिसांनी अटक केली आहे. डांभुर्णी येथे गुरुवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने गोळीबारात कोणालाही दुखापत झाली नाही.