दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या अडचणीत वाढ
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत सत्ताधारी असलेल्या आम आदमी पक्षाचा पराभव झाला. या पराभवानंतर आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. सार्वजनिक निधीच्या गैरवापरप्रकरणी केजरीवाल आणि इतरांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्लीतील न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. याप्रकरणी शिवकुमार सक्सेना यांची याचिका दाखल केली होती.
2019 मध्ये न्यायालयासमोर दाखल केलेल्या तक्रारीत केजरीवाल, आपचे माजी आमदार गुलाबसिंह आणि द्वारका नगरसेवक नीतिका शर्मा यांनी परिसरातील विविध ठिकाणी मोठे होर्डिंग्ज लावून सार्वजनिक पैशाचा जाणूनबुजून गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर, मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटने सप्टेंबर 2022 मध्ये तक्रार फेटाळून लावण्याचा आदेश दिला. यानंतर सत्र न्यायाधीशांनी खटला पुन्हा मॅजिस्ट्रेट कोर्टात पाठवला. या प्रकरणात, विशेष न्यायाधीशांनी मॅजिस्ट्रेट कोर्टाला या प्रकरणाची पुन्हा सुनावणी करण्यास सांगितले होते.
त्यानंतर, न्यायालयाने दिल्ली पोलिसांना 18 मार्च रोजी या प्रकरणी अहवाल दाखल करण्याचे निर्देशही दिले आहेत. न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले की, केजरीवाल आणि इतर पक्ष नेत्यांविरुद्ध सरकारी निधीच्या गैरवापराचा खटला चालवणे योग्य असल्याचेही म्हटले आहे.
मद्य धोरण प्रकरणातही केजरीवालांचे नाव
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर यापूर्वी कथित मद्य धोरण घोटाळ्याचा आरोप आहे. या प्रकरणात त्यांना काही महिने तिहार तुरुंगातही राहावे लागले होते. सध्या ते जामिनावर आहेत. अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्धच्या न्यायालयाच्या आदेशावर आम आदमी पक्षाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, यानंतर त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.
आम आदमी पक्षाचा पराभव
दिल्ली विधानसभेच्या 70 जागांपैकी ‘नवी दिल्ली’ जागा सर्वात जास्त चर्चेत राहिली. नवी दिल्ली मतदारसंघातील भाजप उमेदवार प्रवेश वर्मा यांनी अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला असून विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. त्यातच पक्षाचाही राज्यातून पराभव होताना दिसून आले होते.