dcm ajit pawar target bjp ravi rana
अमरावती : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण रंगले आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी निकाल हाती येणार आहे. त्यामुळे प्रचारासाठी अवघा एक आठवडा बाकी राहिला आहे. नेत्यांचे दौरे अन् सभा वाढल्या आहेत. सत्ताधारी व विरोधी नेत्यांमध्ये वादंग निर्माण झाला असून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. अजित पवार हे सध्या अमरावतीमध्ये आहे. अमरावतीमध्ये भाजप नेते रवी राणा यांनी वक्तव्य केले. रवी राणा यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरील या वक्तव्यावरुन अजित पवार यांनी रोष व्यक्त करत नाराजी व्यक्त केली. तसेच ही विनाशकाले विपरित बुद्धी असल्याचे देखील अजित पवार म्हणाले आहेत.
राजकीय वर्तुळामध्ये रवी राणा हे नेहमी आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी अमरावतीच्या जागेबाबत वक्तव्य केले. अमरावतीची एक जागा निवडणून आली नाही तर काही फरक पडत नाही, असे वक्तव्य रवी राणा यांनी केले. निवडणुकीला अवघे काही दिवस बाकी राहिलेला असताना रवी राणा यांनी अशा आशयाचे वक्तव्य केल्यामुळे अजित पवार संतापले आहे. अजित पवार यांनी अमरावतीमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रवी राणा यांची कानउघडणी केली आहे. तसेच देवेंद्र फडणवीसांनी त्यांना समज द्यावी, असा सल्लाही अजित पवार यांनी दिला आहे.
हे देखील वाचा : उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून जाहीर करा अन्यथा…; ‘आप’ने दिला इशारा
काय म्हणाले अजित पवार?
माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले की, “लोक काहीही बोलत असतात, आपण त्यांच्या प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायचं नसतं. अनेकदा नकारात्मक बोललेलं मतदारांना आवडत नाही. जनता सकारात्मक विचार करत असते, मी पण विधानसभेला दोनदा रवी राणांचं समर्थन केलं. पण आता त्यांनी काय बोलावं हा त्यांचा अधिकार आहे. आम्ही आमचा उमेदवार चांगल्या मताने निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहे. राणा म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी सारखे वागत आहेत. त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं. त्यांच्या अशा बोलण्यानेच लोकसभेला त्यांच्या पत्नीचा पराभव झाला,” असा घणाघात अजित पवार यांनी केला.
पुढे ते म्हणाले की, “त्यांनी देवेंद्र फडणवीसांनी रवी राणा यांना समज द्यावी, असा सल्लाही दिला. सोमवारी आनंदराव अडसूळही मला भेटले होते. त्यांनी सांगितलं की रवी राणा हे त्यांच्याही विरोधात काम करत आहेत. हे बरोबर नाही. याबाबत खरं तर देवेंद्र फडणवीस यांनी योग्य शब्दात त्यांना समज दिली पाहिजे. महायुतीत कुठेही अंतर पडणार नाही, याची काळजी सर्वांची घेतली पाहिजे,” असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.