Devendra fadnavis target rahul gandhi and congress
सांगली : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीमुळे राजकारण रंगले आहे. प्रचाराचा धुराळा उडाला असून सभांचा धडाका सुरु आहे. महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कालपासून (दि.05) प्रचाराला सुरुवात केली आहे. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सांगलीमध्ये सभा पार पडली. या सभेमध्ये देवेंद्र फडणवीसांनी जोरदार राजकीय टीका केली. महाविकास आघाडीवर निशाणा साधला असून उद्धव ठाकरे यांना देखील धारेवर धरले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. यावेळी फडणवीस यांनी जत तालुक्यातील दुष्काळावर भाष्य केले. फडणवीस म्हणाले की, “जत तालुक्याबद्दल एक कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते म्हणाले होते की, जतमध्ये पाणी पोहोचलं तर माझ्या साखर कारखान्याला कामगार मिळणार नाहीत. त्यामुळे इथे पाणी पाठवू नका. वर्षांनुवर्षे या ठिकाणी पाणी देण्यात आलं नाही. जाणीवपूर्वक या ठिकाणी दुष्काळ तयार करण्यात आला. ज्यामुळे येथील माणूस मागे राहिला पाहिजे. तो विस्थापिक राहिला पाहिजे, यासाठी पाणी दिले गेले नाही. पाण्यासाठी कॉंग्रेस जे करु शकलं नाही ते भाजपने करुन दाखवलं,” असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला.
हे देखील वाचा : उद्धवजी तुम्ही पापी…शिवरायांनी टकमक टोकावरून तुमचा कडेलोट…; तुफान राजकीय टीका
कॉंग्रेस सावत्र भाऊ
पुढे फडणवीस म्हणाले की, “यापूर्वी कधीच लिंगायत समाजाचा विचार कोणत्या सरकारने केला नव्हता, आमच्या सरकारने केला. गोपीचंद पडळकर यांनी एमआयडीसी मंजूर करुन घेतली आहे, उद्योग देण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांची आहे. माझ्या गोपीचंदला विधानसभेला पाठवा. उद्योगाचं पत्र देऊनच जतला परत येईल. आम्ही अनेक योजना आणल्या. लाडकी बहीण योजना आम्ही आणल्यानंतर कॉंग्रेस नेत्यांच्या पोटात दुखायला लागलं. बहिणींनो समजून घ्या, आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत. पण तुमचे काही सावत्र भाऊ देखील आहेत. कॉंग्रसेचे हे तुमचे सावत्र भाऊ कोर्टामध्ये गेले. नाना पटोले आणि सुनील केदार यांचे अधिकृत निवडणुक प्रमुख कोर्टामध्ये गेले. त्यांनी मागणी केली की लाडकी बहीण योजना, लेक लाडकी आणि मुलींच्या मोफत शिक्षणाची योजना बंद करा असे कॉंग्रेसने कोर्टात सांगितले,” असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीतील भाषणामध्ये केला.
लाल संविधान का दाखवतात?
पुढे फडणवीस म्हणाले की, “पुन्हा तुमचा आशिर्वाद मिळाला तर लाडकी बहीण योजनेमध्ये 1500 नाही तर 2100 रुपये दिले जाणार आहेत. त्यामुळे एका बाजूला सामान्यांच्या पाठीशी उभे राहणार सरकार आहे. विधानसभेची निवडणूक असल्यामुळे राहुल गांधी महाराष्ट्रात आले आहेत. पण राहुल गांधी ज्या प्रकारची मोट बांधत आहेत ती महाराष्ट्राकरता आणि देशाकरता घातक आहे. भारत जोडो नावाचं संघटन सुरु करुन त्यातून चांगलं काम करत असल्याचं सांगितलं. पण त्या भारत जोडोमधील 100 हून अधिक संघटना या देशामध्ये अराजकता पसरवणाऱ्या आहेत. समाजामध्ये द्वेश आणि दुरभावना कशी निर्माण होईल यासाठी प्रयत्न करणाऱ्या संघटना आहेत. देशाच्या संविधानावर आणि देशाच्या सर्वोच्च्य न्यायालयावर समाजाचा विश्वास कसा कमी होईल, याचा प्रयत्न करणाऱ्या अनेक संघटना राहुल गांधींच्या भारत जोडोमध्ये आहेत. यांचे भारत जोडो नाही तर भारत तोडो आंदोलन आहे. माझा राहुल गांधींना सवाल आहे की, संविधानाचे लालच पुस्तक का दाखवताय? लाल पुस्तकातून कोणाला इशारा देत आहात. आपल्या समाजाची वीण उद्धवस्थ करण्याचा हा प्रयत्न आहे,” असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.