शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा (फोटो - एक्स)
रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीमुळे राज्याचे राजकारण रंगले आहे. निवडणुकीला अवघे दोन आठवडे राहिलेले असताना पक्षांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. सर्व राजकीय पक्ष प्रचाराला लागले असून दिल्लीतील नेते देखील महाराष्ट्रामध्ये आले आहेत. राज्यामध्ये बंडखोरीचे राजकारण झाल्यानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. त्यामुळे सर्व पक्षांसाठी ही प्रतिष्ठेची लढाई ठरणार आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटामध्ये जोरदार राजकीय वादंग निर्माण झाला आहे. ठाकरे गट व शिंदे गटामध्ये आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. आता शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार घणाघात केला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीमध्ये उद्धव ठाकरे यांनी प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे, भाजप व महायुतीवर जोरदार प्रहार केला. त्यांच्या या भाषणाला महायुतीकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला आहे. एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील सर्व आमदार यांच्या नाकावर टिचून निवडून येतील, असा विश्वास रामदास कदम यांनी व्यक्त केला.
हे देखील वाचा : लाडकी बहीणीचे पैसे वाढवले…; अजित पवारांच्या जाहीरनाम्यात आश्वासनांचा पाऊस
रामदास कदम म्हणाले, “उद्धव ठाकरे यांचं भाषण हे हास्यास्पद वाटतं. तीच तीच कॅसेट आता घासलेली वाटते. तेच खोके, तेच गटार… विशेषतः उदय सामंत यांचे भाऊ, नारायण राणेजींची मुले, उद्योग गुजरातमध्ये गेले. कोका कोला कंपनीचा अर्ज तुमच्याकडे कुठल्या वर्षांत आला होता. आदित्य ठाकरे त्या डायरेक्टरला कशाला बोलवत होता, नेमका काय उद्देश होता. तुमच्या अडीच वर्षांच्या काळात कोका कोला कंपनीला परवानगी का दिली नाही. पाच वर्षे तो अर्ज का पडून होता. याचं उत्तर उद्धवजी तुमच्यात हिंमत असेल, प्रामाणिक असाल तर द्या,” असे थेट आव्हान रामदास कदम यांनी दिले.
हे देखील वाचा : मनसेला शिवाजी पार्कवरील दीपोत्सव भोवणार? थेट निवडणूक आयोगाकडे करण्यात आली तक्रार
तसेच उद्धव ठाकरे यांनी स्वर्गीय नेते हिंदूह्द्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची फसवणूक केल्याचे गंभीर आरोप केले. रामदास कदम म्हणाले की, “बाळासाहेब गेल्यानंतर खाण्याचाच कार्यक्रम तुम्ही सुरु केला आहे. तुम्ही मुंबई महानगर पालिकेत काय धंदे केलेत. सगळा मराठी माणूस मुंबईतून घालवण्याचं पाप कोणी केलं. एअरपोर्ट तुम्ही कोणाच्या घशात घातलात. दुसऱ्याला नालायक म्हटलं की आपण लायक होत नाही उद्धवजी! लोकांना फसवण्याचे धंदे थांबवा. हे तुमचं वागणं बघून बाळासाहेबांच्या आत्म्याला शांती लाभणार नाही. एकनाथ शिंदे गद्दार नाहीत, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी तुम्ही केलीत. 40 आमदारांना बदनाम करण्यासाठी खोका तुमच्या डोक्यातून जात नाही, हे सर्व आमदार तुमच्या नाकावर टिचून निवडून येतील. तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज काय कळले… छत्रपती शिवाजी महाराजांनी टकमक टोकावरून तुमचा कडेलोट केला असता. उद्धवजी तुम्ही पापी आहेत, स्वतःच्या वडिलांशी गद्दारी केलीत,: असा गंभीर आरोप करुन रामदास कदम यांनी घणाघात केला.