Samarjitsinh Ghatge targets Ncp Hasan Mushrif
मुरगूड : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्यामुळे राज्याचे राजकारण रंगले आहे. नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप देखील केले जात आहेत. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे प्रचारासाठी केवळ एक आठवडा बाकी राहिला आहे. सर्वच राजकीय पक्ष व नेते जोरदार कामाला लागले आहेत. आता कोल्हापूरमध्ये देखील विधानसभा निवडणुकीमुळे राजकारण रंगले आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार समरजितसिंह घाटगे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना थेट आव्हान दिले आहे. त्यामुळे निवडणुकीमध्ये एकच रंगत चढली आहे.
कागल येथील बाचणी येथे महाविकास आघाडीचे उमेदवार समरजितसिंह घाटगे यांची प्रचारसभा पार पडली. यावेळी जाहीर प्रचार सभेत घाटगे यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर टीकास्त्र डागले. समरजितसिंह घाटगे म्हणाले की, दीर्घ मुदत कर्ज म्हणजे काय ? हे मुश्रीफ साहेब यांना चांगले माहित आहे. तरीही स्वार्थी राजकारण आणि दिशाभूल करण्यात पटाईत असलेल्या शाहू साखर कारखान्यावरील कर्जाबद्दल बोलणा-या हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची नावे जाहीर करावीत. त्यामध्ये त्यांच्या कुटुंबाव्यतिरिक्त जर सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा समावेश असेल तर त्या क्षणाला उमेदवारी मागे घेतो. कारखान्याचा वार्षिक अहवाल त्यांनी दाखविल्यास एक लाख रुपयांचे बक्षीस देतो,असे जाहीर आव्हान महाविकास आघाडीचे उमेदवार समरजितसिंह घाटगे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना दिले.
घाटगे पुढे म्हणाले, “शाहू कारखान्यावरील कर्जाबाबत माहिती त्यांना आम्हीच घरपोच केलेल्या वार्षिक अहवालावरून मिळाली आहे. मात्र त्यांच्या कारखान्याचा वार्षिक अहवालच कोणी पाहिलेला नाही. आमचा कारभार पारदर्शक आहे ‘शाहू’चे संचालक मंडळ कधीही समोरासमोर येऊन याबाबत बोलू शकतो. आम्ही प्रत्येक ठिकाणी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी दिली आहे.आता हसन मुश्रीफ यांच्या सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यावर किती कर्ज आहे? हे सभासदांना माहित नाही. कारण सभासदांनी अहवालच पाहिलेला नाही.
चाळीस हजार शेतकऱ्यांकडून हसन मुश्रीफ यांनी शेअर्स पोटी पैसे घेतलेत. पण ते या कारखान्याचे सभासदच नाहीत. याबाबत अध्याप ते काही बोलत नाहीत.याचा जाब शेतकऱ्यांनी त्यांना विचारलाच पाहिजे, चाळीस हजार कोटी रुपयांचा हिशोब तुम्हाला शेतकऱ्यांना द्यावाच लागेल,” असा घणाघात समरजितसिंह घाटगे यांनी केला आहे.
हे देखील वाचा : पक्ष फोडायला अक्कल लागत नाही…; शरद पवारांनी घेतला देवेंद्र फडणवीसांचा खरपूस समाचार
बिद्रीचे माजी उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील म्हणाले, “पालकमंत्र्यांनी स्वर्गीय विक्रमसिंहराजे घाटगे ,सदाशिवराव मंडलिक,बाबासाहेब कुपेकर, शामराव पाटील, श्रीपतराव शिंदे अशा रथी-महारथीना फसवले. मात्र ही मंडळी आज हयात नाहीत.आता त्यांनी ज्येष्ठ नेते व राजकारणातील वस्ताद असलेल्या शरद पवार यांना फसवले आहे. हा पठ्ठ्या अजून हयात आहे. त्यामुळे येत्या वीस तारखेला ते त्यांनी वस्तादाचा राखून ठेवलेला शेवटचा डाव दाखवल्याशिवाय राहणार नाहीत,” असे मत बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.