शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत सूचक वक्तव्य केले. (फोटो - सोशल मीडिया)
जालना : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. प्रचारासाठी अवघा एक महिना बाकी राहिल्यामुळे जोरदार प्रचार केला जात आहे. नेत्यांच्या सभा, बैठका आणि भाषण वाढली आहेत. अनेक दिल्लीतील नेते महाराष्ट्रामध्ये प्रचारासाठी आले आहेत. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. मतदार मतदानरुपी आशिर्वाद महायुती देणार की महाविकास आघाडीला देणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. तसेच पुढचे राज्याचे मुख्यमंत्री कोण होणार याची देखील उत्सुकता लागली आहे.
महायुती व महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या पूर्वी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्यात आलेला नाही. महायुतीच्या सध्याच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असले तरी पुन्हा एकदा ते मुख्यमंत्री होतील की नाही याबाबत शंका आहे. तर भाजप पक्षश्रेष्ठींकडून प्रचारामध्ये देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील याबाबत सूचक विधान केले आहे. त्याचबरोबर अजित पवार यांना देखील राज्याचे मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. यामुळे आता महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण याची उत्सुकता लागली आहे. आता शिंदे गटातील आणखी एका नेत्याने मुख्यमंत्रिपदाबाबत सूचक विधान केले आहे.
हे देखील वाचा : पक्ष फोडायला अक्कल लागत नाही…; शरद पवारांनी घेतला देवेंद्र फडणवीसांचा खरपूस समाचार
शिंदे गटाचे नेते व उमेदवार अब्दुल सत्तार यांनी प्रचारसभा घेतली. यावेळी अब्दुल सत्तार म्हणाले की, “मला कुत्रा निशाणी मिळाली तरी मी निवडून येऊ शकतो. सध्या विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे ते खालच्या पातळीवर जाऊन जातीपातीवर मतं मागत आहेत. महाराष्ट्रात मोजून चार पाच नेते आहे, त्यात माझं नाव आहे. पण काही लोक त्यामुळे माझ्यावर जळतात. माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद आहे. हे किरकोळ लोक माझ्याशी काय सामना करणार आहेत. मी गेल्या 25 वर्षांमध्ये कोट्यावधी रुपयांची काम केली आहेत. जो विकास कामे करतोय, त्याला मतदान करा”, असे मत अब्दुल सत्तार यांनी केले
हे देखील वाचा : उद्धव ठाकरेंकडे असं दडलंय तरी काय? पुन्हा गोवा महाराष्ट्र सीमेवर गाडी अडवली
महाविकास आघाडीमध्येही रस्सीखेच
मुख्यमंत्रिपदावरुन फक्त महायुतीमध्ये नाही तर महाविकास आघाडीमध्ये देखील रस्सीखेच सुरु आहे. महाविकास आघाडीचे अडीच वर्षांचे सरकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये चालले. मात्र आता लोकसभा निवडणुकीनंतर कॉंग्रेसच्या देखील महत्त्वकांशा प्रफुल्लित झाल्या आहेत. मुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरे व संजय राऊत यांनी अनेकदा सूचक वक्तव्य केले आहे. तसेच आम आदमी पक्षाने देखील उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून घोषित करण्याची मागणी केली. मात्र कॉंग्रेसकडून पदावरुन दावा सांगितला जात आहे. तर शरद पवार यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत सावधगिरीची भूमिका घेतली. निकालानंतर आणि ज्याचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री होईल, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे. त्यामुळे महायुती व महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदावरुन जोरदार राजकारण रंगणार आहे.