'खेड तालुक्यातील 'लाडक्या बहिणी' माझ्या पाठीशी'; आमदार दिलीप मोहिते यांचा विश्वास
राजगुरूनगर : खेड तालुक्यातील लाडक्या बहिणी माझ्या पाठीशी ठामपणे असून, येत्या 20 तारखेला मतदानरूपी आशीर्वाद मला देणार असल्याचा विश्वास आमदार दिलीप मोहिते यांनी व्यक्त केला. तसेच लाडकी बहीण योजनेची रक्कम 1500 रुपयांवरून 2100 होणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले.
हेदेखील वाचा : PM Narendra Modi : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे महाघोटाळाचे ATM नाही होऊन देणार नाही…; पंतप्रधान मोदींचा अकोल्यातून एल्गार
मेदनकरवाडी येथे खानदेश परिवार आयोजित दीपावली सांज कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अनेक माता-भगिनिंशी दिलीप मोहिते पाटील यांनी संवाद साधला. विधानसभेची निवडणूक एकतर्फी होणार आहे. विरोधी उमेदवाराचा जिल्हा परिषद गट सोडला तर तालुक्यात त्यांचा प्रभाव दिसत नाही. खेड तालुक्यात राज्य सरकारने सुरु केलेल्या लाडकी बहीण योजनेत एक लाख 17 हजार महिला पात्र ठरल्या असून, दर महिन्याला त्यांच्या बँक खात्यात 1500 रूपये असे आजपर्यंत त्यांच्या बँक खात्यात साडे सात हजार रुपये महायुतीच्या सरकारने जमा केले आहेत.
तालुक्यातील सर्व लाडक्या बहिणी माझ्या पाठीशी आहेत. दर महिन्याला सरकार तालुक्यातील महिलांच्या खात्यात योजनेची रक्कम थेट जमा होते. महायुतीचे सरकार आल्यास लाडकी बहीण योजनेची रक्कम 1500 रुपयांवरून 2100 रूपये होणार आहे. लाडकी बहीण योजनेमुळे महिलांनी दिवाळी उत्साहात साजरी केली.
सर्व ‘लाडक्या बहिणी’ माझ्या पाठीशी
खेड तालुक्यातील ‘लाडकी बहीण’ योजनेचा मी अध्यक्ष आहे. तालुक्यातील सर्व लाडक्या बहिणी माझ्या पाठीशी असून, येत्या 20 तारखेला मतदानरूपी आशीर्वाद मला त्या देणार आहेत. त्यामुळे मी मोठ्या मताधिक्याने विजयी होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
…म्हणून सरकारने सुरु केली योजना
माझ्या माता भगिनी त्याग करुन, काबाड कष्टातून प्रपंच उभा करतात. प्रपंचाचा गाडा हाकताना त्या आपल्या आवडी निवडी, हौसमौज याकडे दुर्लक्ष करतात. त्या सर्व माय-माऊलीसाठी त्यांच्या आवडी निवडी त्यांना जोपासता याव्यात, यासाठी राज्य सरकारने राज्यातील सर्व महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली.
आता महिलांनाच मतदानाबाबत ठरवायचंय
महिलांच्या कष्टाची किंमत करायची झाल्यास त्यांना दीड लाख रुपये पगार द्यावा लागेल. महिलांचा त्याग लक्षात घेऊन त्यांना महिन्याला दीड हजार रूपये देण्याचे ठरवले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे भाषणं करताना सांगतात, आमचे सरकार आल्यावर राज्यात युती सरकारने सुरु केलेल्या सर्व योजना आम्ही बंद करु. तालुक्यातील महिलांनी ठरवायचे आहे की लाडकी बहीण योजना सुरू करणाऱ्या महायुतीच्या सरकारला मतदान करायचे की योजना बंद करू म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांना मतदान करायचे?
हेदेखील वाचा : नीरज चोप्राला मिळालाय नवीन कोच; ज्याच्या नावावर आहेत तीन जागतिक विजेतेपदाचे रेकॉर्ड