Mallikarjun Kharge's auditorium in Nashik was blown up
नाशिक : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे काही दिवस बाकी राहिल्यामुळे प्रचाराचा धुराळा उडाला आहे. दिल्लीतील नेते राज्यामध्ये ठाण मांडून बसले आहेत. महायुतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे प्रचारासाठी उतरले आहेत. तर महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी व मल्लिकार्जुन खरगे हे प्रचारसभा घेत आहेत. पण नाशिकमध्ये अजब घटना घडली आहे. कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या प्रचारसभेचा मंडप चक्क उडून गेला आहे.
नाशिकमध्ये राजकारण रंगले आहे. नाशिकमध्ये कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची प्रचार सभा होती. सभेची पूर्ण तयारी झालेली असताना मल्लिकार्जुन खरगे यांचा सभेचा मंडप चक्क उडून गेला आहे. मल्लिकार्जुन खरगे हे नाशिकच्या इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचारासाठी आले आहेत. हा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव असून महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ कॉंग्रेसकडे आला आहे. कॉंग्रेसकडून लकी जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
लकी जाधव यांच्या प्रचारासाठी मल्लिकार्जुन खरगे हे प्रचारसभा घेत होते. या सभेसाठी उभारण्यात आलेला मंडप अचानक उडाला. वादळामुळे आणि वाऱ्यामुळे हा सभामंडप कोसळला. या सभा मंडप उडाल्याच्या घटनेमुळे दोन कार्यकर्ते किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. तर मंडप अचानक उडाल्यामुळे सभास्थळी कार्यकर्त्यांची आणि सभेसाठी आलेल्या लोकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसून आले. या घटनेमुळे हेलिपॅडवरून निघालेल्या मल्लिकार्जुन खरगे यांचा ताफा पुन्हा माघारी परतला. यानंतर मल्लिकार्जुन खरगे पुन्हा सभा स्थळी दाखल झाले. आता ही सभा पार पडणार असून यावेळी ते कोणावर निशाणा साधणार याची उत्सुकता लागली आहे.
नाशिकमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण रंगले आहे. इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. हा राखीव मतदारसंघ असून अनुसूचित जमातीसाठी तो राखीव आहे. या मतदार संघामध्ये हिरामण खोसकर हे विद्यमान आमदार आहेत. ते 2019 ची निवडणूक कॉंग्रेसकडून लढले होते. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणूकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश केला. आता त्यांना अजित पवार गटाकडून महायुतीची उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे हिरामण खोसकर विरुद्ध लकी जाधव अशी चुरशीची लढत होणार आहे.