File Photo : Supriya Sule
नाशिक : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार राजकारण रंगले आहे. प्रचारासाठी अवघा एक आठवडा बाकी राहिला असल्यामुळे सभांचा धडाका वाढला आहे. आज राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी नाशिक दौऱ्यावर आहेत., मध्ये सभा घेतली. बागलाण विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार दीपिका चव्हाण आणि चांदवड विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार शिरीषकुमार कोतवाल यांच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे यांची सभा झाली. यावेळी त्यांनी महायुतीवर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
राज्यामध्ये बंडखोरीचे राजकारण झाल्यानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. त्यामुळे सर्वांसाठी ही प्रतिष्ठेची लढाई आहे. नाशिकमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “देवेंद्रजींना आता देवभाऊ म्हणतात, त्यांचे नाव आता बदलले. मी आलो दोन पक्ष फोडून आलो, असे ते म्हणतात. देवाभाऊ तुमसे ये उम्मीद नहीं थी, गडकरी चांगले आहेत, त्यामुळे देवेंद्र फडणवीस चांगले असतील, असे वाटले होते. मात्र देवाभाऊ कॉपी करून पास झाले, दोन पक्ष फोडून पास झाले,” अशी घणाघाती टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
हे देखील वाचा : पोलिसांची नजर चुकवली अन् गोत्यात आला; नागपूरात कोट्यवधींची रोकड नेणाऱ्या तरुणाला अटक
राज्य सरकारकडून निवडणुकीच्या पूर्वी लाडकी बहीण योजना जाहीर केली. यावरुन देखील सुप्रिया सुळेंनी टोला लगावला आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “या राज्यात सगळ्यात लाडकी बहीण मी आहे. लोकसभा निवडणुकीत तुम्ही दणका दिला. लगेच लाडकी बहीण योजना काढली. त्यांना बहीण भावाचं नातं कळत नाही, पैशाने सर्व खरेदी करता येत नाही. मला देवभाऊंना विचारायचे आहे. तुमचे नेते (धनंजय महाडिक) महिलांना धमकी देतात आणि तुम्ही गप्प बसतात, असा गृहमंत्री आपल्याला पाहिजे का? नाती जोडायला ताकद लागते. माझं भाषण ऐका, देवाभाऊ आले तर त्यांचेही भाषण ऐका. विरोधक दिलदार पाहिजे. आपले सरकार दहा दिवसांत येणार आहे. त्यानंतर आम्ही आपले प्रश्न सोडवू,” असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी नाशिकमधील सभेमध्ये वक्त केले.
नाशिकमध्ये अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ व नरहरी झिरवळ यांच्या विरोधात शरद पवार गटाने जोरदार शड्डू ठोकला आहे. शरद पवार यांनी देखील नाशिकमध्ये सभांचा धडाका लावला आहे. त्यानंतर आता सुप्रिया सुळे या नाशिक दौऱ्यावर आहेत. शरद पवार यांच्यावर दौऱ्याबाबत देखील सुप्रिया सुळेंनी वक्तव्य केले. त्या म्हणाल्या की, “काल पवार साहेबांनी 7 सभा घेतल्या. मी रात्री त्यांच्याशी भांडण केले, आवाज चढविला पण ते म्हणाले गप्प बस… पवार साहेब सत्तेत येणार आहेत का? ते कशासाठी करतात? ते थोडीच सरकारमध्ये बसणार आहेत? चांगले सरकार येणार म्हणून ते फिरत आहेत,” असे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे.