एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का; पुण्यातील बडा नेता धनुष्यबाण हाती घेणार
माहिम : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अवघ्या 15 दिवसांवर निवडणूका आल्या असल्यामुळे राजकारण रंगले आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये माहिम विधानसभा मतदारसंघ चर्चेचे कारण ठरला आहे. या मतदारसंघातून पहिल्यांदाच राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे निवडणूक लढवत आहेत. अमित ठाकरे हे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्यामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. आता मनसेकडून महायुतीवर आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली जात आहे.
महायुतीमध्ये माहिम हा मतदारसंघ शिंदे गटाकडे आला आहे. शिंदे गटाकडून माहिममधून सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली आहे. मात्र महायुतीमधील भाजप पक्षाने राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्याची मागणी केली आहे. मात्र सरवणकर यासाठी तयारी नाहीत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर देखील सदा सरवणकर हे निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. सरवणकर यांनी निवडणुकीतून माघार घ्यावी, यासाठी महायुतीच्या नेत्यांकडून प्रयत्न सुरु आहेत. राज ठाकरेंनी भाजपला लोकसभा निवडणुकीमध्ये बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यामुळे आता भाजपकडून देखील शिंदे गटाला उमेदवारी मागे घेण्याबद्दल सांगितले जात आहे. मात्र यावरुन महायुतीमध्ये मतभेद असून माहिम विधानसभा मतदारसंघामध्ये राजकारण तापले आहे.
आता मनसे नेत्यांकडून देखील शिंदे गटावर टीका होण्यास सुरुवात झाली आहे. मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात केला आहे. त्यांनी म्हटलंय की, “राज ठाकरे यांचा स्वभाव प्रचंड वेगळा आहे. आम्ही कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव घेऊन एकनाथ शिंदे किंवा महायुतीकडे गेलेलो नाही. मात्र, आम्ही ज्या पद्धतीने लोकसभेला पाठिंबा दिला त्याची परतफेड म्हणून तरी या लोकांनी विचार करायला हवा होता. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे दोघेही संकुचित विचारांचे आहे हे यावरून सिद्ध होते,” अशी टीका त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.
मनसेकडून मुंबईमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदा देखील जोरदार दिवाळी साजरी केली जात आहे. मनसेचा दिपोत्सव हा अत्यंत लोकप्रिय आहे. यावेळी दिपोत्सवामध्ये पक्षाचे चिन्ह आणि नाव असलेले भगवे कंदील लावण्यात आले होते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर असे कंदील लावून मनसे अप्रत्यक्ष प्रचार करत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला होता. निवडणूक आयोगाने याची दखल घेतल्यानंतर मनसेने आता दिपोत्सवातील कंदील हटवले. याबाबत विचारले असता यशवंत किल्लेदार म्हणाले की, “आम्ही निवडणूक आयोगाची कंदील लावण्यासाठी वेगळी परवानगी घेतली होती. या गोष्टी आम्ही विना परवानगी केलेल्या नाहीत. एकीकडे महापालिका परवानगी देते आणि दुसरीकडे महापालिकाच कंदील काढते अशी दुटप्पी भूमिका महापालिकेने घेतली आहे,” असे स्पष्ट मत मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी व्यक्त केले आहे.