Chhagan Bhujbal targets Jitendra Awhad
नाशिक : राज्यामध्ये राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. प्रचारासाठी अवघे 15 दिवस बाकी राहिल्यामुळे सर्व राजकीय पक्ष जोरदार कामाला लागले आहेत. प्रचार सभा व बैठका यांचे सत्र वाढले आहे. राज्यामध्ये बंडखोरीचे राजकारण झाल्यानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक असल्यामुळे शिंदे गट व अजित पवार गटासाठी ही प्रतिष्ठेची लढाई आहे. तर राष्ट्रवादीच्या व शिवसेनेच्या दोन्ही गटातील नेत्यांमध्ये जोरदार टीका केली जात आहे. आता जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या टीकेवर अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी मत व्यक्त केले आहे.
अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य केले. छगन भुजबळ यांच्या टीकेवर देखीस प्रत्युत्तर दिले. जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांची टोळी पाकिटमार व चोर असल्याचे म्हटले. त्याचबरोबर दम असेल तर घड्याळ चिन्हावर न लढता दुसऱ्या चिन्हावर लढवावी अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. त्यांच्या या टीकेवर छगन भुजबळ यांनी जोरदार प्रत्युत्तर देत शब्द जपून वापरावे असा सल्ला देखील छगन भुजबळ यांनी दिला आहे.
हे देखील वाचा : अखेर मनोज जरांगेंनी ठोकला शड्डू; ‘या’ मतदारसंघातून उतरणार निवडणुकीच्या रिंगणात
माध्यमांशी संवाद साधताना छगन भुजबळ म्हणाले की, “आपण शब्द कुठले वापरावेत? याचा विचार जितेंद्र आव्हाड यांनी केला पाहिजे. विचार करून शब्द वापरले पाहिजेत. आपण कोणाला काय म्हणतो, कोणाला काय बोलतो? याचा विचार केला पाहिजे. जे तुमच्याबरोबर 25 ते 30 वर्ष राहिले आहेत. त्या सर्वांना ते लागू होतं. मला वाटतं की त्यांनी एवढ्यावर समजून घेतलं पाहिजे. कारण त्यांच्या राजकीय आयुष्यामध्ये त्यांना पुढे आणण्यात शरद पवारांचा हात आहे. तसं त्यांच्या राजकीय आयुष्यामध्ये त्यांना पुढे आणण्यात माझाही हात आहे हे त्यांनाही माहिती आहे. त्यामुळे त्यांनी शब्द सांभाळून वापरले पाहिजेत”, असा सल्ला छगन भुजबळांनी जितेंद्र आव्हाडांना दिला आहे.
हे देखील वाचा : अजित पवारांची ही टोळी पाकीटमाऱ्यांची टोळी; आमदाराची जिव्हारी लागणारी टीका
त्याचबरोबर मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी देखील बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, फुलंब्री या मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. केज गेवराई आणि आष्टी मतदारसंघाबाबत चर्चा सुरु असल्याचे सांगितले आहे. याबाबत विचारले असता छगन भुबजळ म्हणाले की, “सर्वच मतदारसंघात सरासरी 30 उमेदवार आहेत. उद्या माघारीनंतर खरे चित्र स्पष्ट होईल. महायुती, महविकास आघाडी आणि सर्वच पक्ष बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न करतील. बंडखोरी हा प्रत्येक निवडणुकीतील एक महत्वाचा भाग आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांना भेटल्याने फायदा होईल, असे अनेकांना वाटत असेल. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. मात्र आता कोणाची मक्तेदारी राहिलेली नाही. मतदार वैचारिक आणि सुज्ञ झाले आहेत. सर्व गोष्टी तपासूनच मतदान करतात,” असा टोला अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी लगावला आहे.