Photo credit- Social Media
ठाणे : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अर्ज छाननी प्रक्रिया सुरु असून अर्ज मागे घेण्यासाठी अवधी दिला गेला आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे. त्यामुळे राज्यामध्ये नवीन सरकार स्थापन होणार की पुन्हा महायुती सरकार येणार याची उत्सुकता लागली आहे. राज्यामध्ये बंडखोरीचे राजकारण झाल्यानंतर ही पहिलीची विधानसभा निवडणूक होत आहे. त्यामुळे यामध्ये प्रत्येक पक्षातील दोन गटामध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट अशी शाब्दिक चकमक सुरुच आहे. आता शरद पवार गटाच्या नेत्यांने अजित पवार गटाला पाकिटमार टोळी असे म्हटले आहे.
हे देखील वाचा : पोलिसांच्या गाड्यांमधून महायुतीच्या उमेदवारांना रसद; शरद पवार यांचा गंभीर आरोप
शरद पवार गटाचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड हे आपल्या आक्रमक बोलीसाठी ओळखले जातात. जितेंद्र आव्हाड हे नेहमी परखडपणे आपले मत मांडताना दिसतात. आता पुन्हा एकदा आव्हाडांनी आपली तोफ अजित पवार गटावर डागली आहे. ठाण्यातील चंदननगर मुंब्रा या ठिकाणी आयोजित केलेल्या सभेत जितेंद्र आव्हाड बोलत होते. ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवार यांचा होता. पण एके दिवशी अजित पवार येतात आणि धक्के मारुन शरद पवारांना बाहेर काढतात. जाताना त्यांच्याकडील घड्याळ देखील हिसकावून नेतात. ही चोरांची टोळी आहे. अजित पवारांची ही टोळी पाकिटमार आहे, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी आपला रोष व्यक्त केला.
जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांना थेट आव्हान देखील दिले. भाषणामध्ये बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, या अशा चोरांच्या टोळीपासून सावध रहा. अजित पवारांमध्ये हिमंत असेल तर त्यांनी नवं चिन्ह घेऊन निवडणूक लढवावी. तुमच्यात हिंमत होती , अजित पवार मर्द की औलाद होते तर म्हणाले असते शरद पवारांनी तुतारी निशाणी घेतली. मीही दुसरं चिन्ह घेऊन लढतो असं म्हटलं असतं तर आपण त्याला मर्द म्हणतो. तुम्ही तर तुमच्या काकाने देशात वाढवलेली पार्टी ती चोरून माझी पार्टी पार्टी म्हणून फिरत आहात. पण जनतेला वास्तव काय आहे हे माहीत आहे, असा गंभीर शब्दांमध्ये घणाघात जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
अजित पवारांची बारामतीकरांना साद
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार हे बारामती दौरा करत असून विविध गावांना भेटी देत आहेत. तसेच मतदारांना आवाहन देखील करत आहेत. अजित पवार यांनी बारामतीकरांना भावनिक साद घातली आहे. अजित पवार म्हणाले की, “लोकसभेला जर सुप्रिया पडली असती तर साहेबांना या वयात कसं वाटलं असतं, म्हणून तुम्ही सुप्रियाला मतदान केलं. त्यामुळे आता विधानसभेला तुम्ही मला मतदान करा. लोकसभेला साहेबांना खुष केलं आता मला पण खुष करा. साहेब साहेबांच्या परीने विकास करतील मी माझ्या पध्दतीने तालुक्याचा विकास करेल,” अशी साद अजित पवार यांनी बारामतीकरांना घातली.