Sanjay Raut accuses Supreme Court and elections of being responsible for Maharashtra political situation
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. महायुतीच्या बाजूने एकतर्फी निकाल जाहीर झाला आहे. तरी देखील सरकार स्थापनेला विलंब होत असल्यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन शपथविधीची तारीख व वेळ जाहीर केली आहे. यानंतर आता ठाकरे सेनेचे संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे.
संजय राऊत यांनी काळजीवाहू सरकार ही पद्धत देखील संविधानाच्या विरोधात असल्याची टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले की, “काळजीवाहू सरकार अशी संकल्पना संविधानामध्ये नाही. महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत 26 तारखेलाच संपली आहे. त्यामुळे राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू व्हायला पाहिजे होती. हे त्यांचे भाडोतरी कायदेपंडित काहीही कागद आणून दाखवतील. निकाल लागून 10 दिवस झाले तरी अद्याप सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही. बहुमत असून देखील दावा का केला नाही? मुख्यमंत्री कोण आणि भाजपचा विधीमंडळाचा नेता कोण? या संदर्भात निर्णय झालेला नाही. एवढा मोठा पक्ष असून निर्णय घेता येत नाही,” असा घणाघात संजय राऊत य़ांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
पुढे संजय राऊत म्हणाले की, “यांना राज्यपालांचे अधिकार दिलेले आहेत का? हे सांगत आहेत की आम्ही 5 तारखेला शपथ घेऊ. चंद्रशेखर बावनकुळे हे काय राज्यपाल आहेत का? हा निर्णय राज्यपालांचा असतो. यांनी अजून सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही. ही अत्यंत गंभीर परिस्थिती असून घटनात्मक पेचप्रसंग आहे. याला जबाबदार माजी सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड आहेत. सुप्रीम कोर्ट व निवडणूक आयोग या सर्व घटनात्मक संस्था महाराष्ट्रातील परिस्थितीला जबाबदार आहेत,” असा घणाघात संजय राऊत यांनी केले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, “एकनाथ शिंदे हे होणाऱ्या 5 तारखेच्या शपथविधीला तरी येणार आहेत का? त्यांना खरंच डॉक्टरांची गरज आहे की मांत्रिकाची गरज आहे. हे मांत्रिक अमित शाह किंवा नरेंद्र मोदी पाठवतील. यांच्या अंगामध्ये जी भुतं संचारली आहेत ती उतरवायला लागतील. हे काम आता देवेंद्र फडणवीस करत असतील तर ही चांगली गोष्ट आहे,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
पुढे त्यांनी महायुतीमध्ये खातेवाटपावर सुरु असलेल्या गोंधळावर टीका केली. खासदार राऊत म्हणाले की, “एकनाथ शिंदे हे त्यांना कोणतं खातं हवं ते स्वतः ठरवू शकत नाहीत. त्यांना नरेंद्र मोदी व अमित शाह ठरवणार आहेत. यांच्यासमोर कोणती हाडं टाकायची आणि काय चघळायचं हे यांच्या हातात नाही. यांच्या हातामध्ये फार तर रुसवे फुगवे आणि नंतर शरण जाणे या पलिकडे यांच्या हातामध्ये काहीच नाही. आम्ही जो निर्णय घेतला तो आमच्या स्वाभिमानासाठी घेतला होता,” असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.