Prahar Anil Gawande joins BJP
अकोला : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये जोरदार राजकारण रंगले आहे. निवडणुकीला अवघा एक महिना बाकी राहिला असून राज्यामध्ये कोण सरकार स्थापन करणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. राज्यातील बंडखोरीच्या राजकारणानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक असल्यामुळे रंगत वाढली आहे. महायुती व महाविकास आघाडीसह राज्यामध्ये आणखी एक पक्ष व नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. यामध्ये तिसरी आघाडी देखील निवडणुकीच्या मैदानात उतरली असून जोरदार लढत देणार आहे. दरम्यान, भाजप व देवेंद्र फडणवीस यांच्या गळाला मोठा नेता लागला आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रहार पक्ष जोरदार तयारीला लागला आहे. तिसरी आघाडी निर्माण करुन प्रहार नेते बच्चू कडू यांनी वेगळी चूल मांडली आहे. महाविकास आघाडी व महायुती अशा दोन्ही सरकारमध्ये बच्चू कडू सामील झाले होते. मात्र मंत्रिपदावरुन मतभेद होऊन त्यांचे महायुतीमध्ये बिनसले. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीवेळी नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्यामुळे देखील बच्चू कडू नाराज होते. आता विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी तिसरी आघाडी निर्माण केली आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाला मोठा धक्का दिला आहे.
हे देखील वाचा : देवेंद्र फडणवीसांची डोकेदुखी वाढणार; बडा नेता करणार बंडखोरी
प्रहारचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे हे भाजपमध्ये जाणार आहे. प्रहारचे प्रदेशाध्यक्ष असलेले अनिल गावंडे हे बच्चू कडूंची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे अकोला विधानसभा मतदारसंघामध्ये जोरदार राजकारण रंगले आहे. त्यामुळे प्रहार पक्षाला मोठा धक्का बसला आहे. भाजपने राजकारणामध्ये खेळी करत प्रहार प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांचे मन वळवले आहे.
प्रहार पक्षाचे भाजप प्रवेश होत असल्यामुळे बच्चू कडू यांनी देखील राजकारण केले आहे. बच्चू कडूंनी भाजपचा बडा मासा गळ्याला लावत अकोल्यात मोठी खेळी खेळली आहे. भाजपचे आठ वर्ष अकोला शहराध्यक्ष राहिलेले आणि सध्या प्रदेश कार्यकारणी सदस्य असलेले डॉ अशोक ओळंबे यांनी प्रहारमध्ये प्रवेश केला आहे. अशोक ओळंबे यांना उमेदवारी देखील दिली जाणार आहे. त्यामुळे भाजपबरोबरच प्रहार नेते बच्चू कडू यांनी देखील मोठी खेळी खेळली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे यांचाही मध्यरात्री प्रहारमध्ये प्रवेश झाल्याचे देखील बोलले जात आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांच्या पक्षामध्ये नेत्यांचे पक्षांतर वाढते आहे. यामुळे महायुती व महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढत असून राज्याच्या निवडणुकीमध्ये तिसरी आघाडी देखील निर्णायक ठरणार आहे.