
Exclusive: रुचिताचा खडतर प्रवास तिच्याच शब्दात (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
बिग बॉस ६ मधून घरोघरी रुचिता जामदार पोहचली. पण तिच्यासाठी हा प्रवास किती आणि कसा वेगळा होता याबाबत तिने अगदी मनमोकळेपणाने सांगितलं आहे. एक स्त्री म्हणून स्वप्नं पाहणं आणि ती पूर्ण करण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते याबाबतही तिने सांगितलं. परिस्थिती नाही म्हणून रडत बसण्यापेक्षा दोन हात करत पुन्हा उठून उभं राहून नशीब चमकविण्याचा निर्धार महत्त्वाचा आहे असंच तिने नवराष्ट्र विशेष ‘माझ्यातील दुर्गा’मध्ये सांगितलं आहे.
मागे वळून बघताना करिअरची सुरूवात, संघर्ष, आर्थिक चणचण या सगळ्यातून तुला पहिली दुर्गा कशी सापडली? यावर रुचिताने अभिमानाने सांगितलं की, ‘मला प्रवास बघताना भारावून येतं. मी खूप मोठी झाले आहे असं नाही म्हणणार. माझं स्वप्नं पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे. त्यावेळी तू काय करणार किंवा सोशल मीडियावर ताशेरे ओढले, कोण होतीस या सर्वांना मला सांगायचं आहे की, उघड्या डोळ्यांनी स्वप्नं पाहिली आणि खूप मेहनत केली आणि यामध्ये खूप कुटुंबाने मेहनत केली आहे. प्रत्येक गोष्टीची कदर आहे. हा प्रवास कधीच सोपा नव्हता. बाळूमामाच्या नावानं चांगभलं अशी मालिका लहान भूमिका केल्या होत्या. पण मध्ये काहीच काम नसण्याचा फेज आला. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूपच त्रासदायक होती. माझ्यावर एक जबाबदारी होती. स्वतःची स्वप्नं पूर्ण करताना गोष्टी नक्की कशा सावरायचं हे होतं. आपली स्वप्नं पूर्ण करताना अनेक कामं केली, लग्नात डान्स करणे, फुलं टाकणं ही सर्व कामं केली.
तो प्रवास पाहताना बिग बॉसच्या स्टेजवर आर्टिस्ट म्हणून मी परफॉर्म करताना मला खूप भारावून आला. प्रिमीयरच्या डान्सच्या दरम्यान मी रडत होते. कारण बॅकराऊंड आर्टिस्टमधून मुख्य कलाकार म्हणून संधी मिळाली हे खूप छान वाटतंय. शिकतेय, चुकतेय घडतेय परत शिकतेय पण मला स्वतःचा अभिमान आहे, असंही तिने सांगितलं.
Exclusive: ‘कधीही हरून जाऊन आत्मविश्वास गमावू नका’, शैला काणेकर यांचा महिलांना मोलाचा सल्ला
क्षेत्र निवडलं तेव्हा सुरक्षितता नसतानाही तू कशी आलीस? यावर रुचिता म्हणाली की, ‘घरच्यांना वाटत होतं की डॉक्टर व्हावं आणि अभ्यासातही मी हुशार होते. दहावी आणि बारावीत रियालिटी शो करूनही मला चांगले टक्के मिळाले. ही कला वडिलांकडून मिळाली आहे. डॉक्टर बनावं आहे हे कुटुंबाकडून इच्छा सांगण्यात आली तेव्हा सायकोलॉजी घेऊन डोक्याचं डॉक्टर व्हावं असा विचार मी केला.
हे संतुलित करताना दोन्हीचा भार खूप जास्त आहे. अनेक गोष्टी मी शिकले आहे. भरतनाट्यम, कथ्थक, लावणी, दांडपट्टा, लाठीकाठी केलंय. खूप काही शिकले. त्यासाठी गुंतवणूक करावी लागते. सकाळी ६ ते रात्री १ खूप व्यस्त असायचे. तुम्ही कितीही स्वप्नं पहा पण हे तुमच्या नशिबावर अवलंबून आहे. अनेक जण खूप टॅलेंटेड आहेत पण संधी मिळत नाही. तुम्ही प्रॅक्टिकल रहा नक्की. पण तुमच्याकडे प्लान बी असायलाच हवा. मी माझं करिअर सांभाळत, अभ्यास सांभाळत इथे आले आहे. स्वप्नं बघण्यापासून थांबू नका. कधी संधी मिळेल तुम्हाला कळणार नाही.’
अनेक ट्रोल्स, बलात्कार धमक्या असं असतानाही तू घाबरली नाहीस, यातून कशी बाहेर पडलीस? हे खूप कष्टदायक असल्याचं तिच्या बोलण्यातून जाणवलं, ‘आई-वडिलांच्या प्रेमात वाढलेली मुलगी. पण या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं हे माहीतच नव्हतं. विहीरीत पडल्याशिवाय पोहायला जमत नाही. हे खूप भीतीदायक आहे. घाबरायला होतं, कुटुंबालाही त्रासदायक आहे. रोडीजनंतर आई मला घराबाहेर सोडायलाही घाबरायची. सुरूवातीला खूप घाबरले, पण माझ्यातली दुर्गा जागी झाले आणि मला डगमगून चालणार नाही, हिंमत ठेऊन मी पुढे आले. कुटुंबाला मी समजावलं आणि कामाला सुरूवात केली.
रंग, रुप, केस यावरून खूप त्रास देण्यात आला शाळेत. यामुळे मला मित्रमैत्रिणीही खूपच कमी आहे. बाबा अॅम्ब्युलन्समधून सोडायला यायचे. त्यामुळे लोकांनाही भीती वाटयची. पण परिस्थितीमुळे हे करावं लागायचं. पण या सगळ्यामुळे ही ताकद मला मिळाली आहे. सहन करणारी रुचिता मी नाही राहिले आणि त्यामुळेच माझ्यातली दुर्गा मला सापडली.’
बिग बॉस ६ मराठीमधून जेव्हा तू समोर आलीस तेव्हा अनेकांनी तुला चुकीचं समजलं वाटतं का, यातून कशी बाहेर आलीस? यावर ठामपणे ती म्हणाली की, ‘मी सध्या प्रयत्न करतेय की माझा प्रवास चालू आहे. पण माझ्या कामातून मी स्वतःला सिद्ध करते आहे आणि तिथे १ तास आम्ही दिसतो. तिथे कायम रुचिता भांडताना दाखवली आणि माझी काळजीची बाजू बाहेर आली नाही पण इतर कामातून ती बाजू नक्कीच बाहेर येईल आणि मी आहे रावडी मला त्याचा अभिमान आहे. मुलींनी स्वतःसाठी उभं राहिलं नाही तर जग उभं नाही राहतं. चुकीचं होतंय तिथे मी अजिबात गप्प बसत नाही आणि तिथे मी वाचा फोडते.
भाऊच्या धक्क्यावर हे सर्व सांगितलं जायचं तर तिथे वाटायचं की, नक्की कुटुंबावर काय त्रास होत असेल का, ट्रोलर्स आणि हेटर्स हे हार्टलेस असतात. क्रिटिसाईज करणं आणि हेट करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. समीक्षा करणं हा तुमचा हक्क आहे. पण घरच्यांना शिवीगाळ करणं हे चुकीचं आहे. कुटुंबाला माहीत आहे की, मुलगी खूप धीट आहे.’
मला लहानपणापासून हिरॉईन बनायचं होतं. पण त्यासाठी खूप तयारी केली. मी आणि कुटुंबाने खूप मेहनत घेतली आहे. मी माझं कौशल्य सतत टोकदार केले आहे. भाऊ अंडर १९ खेळायचा. पण त्याने परिस्थितीमुळे माझं स्वप्नं पूर्ण करण्यासाठी स्वतःचं स्वप्नं सोडलं आणि मला साथ दिली.
रियालिटीमुळे कानाला खडा बसलाय का? यावरही रुचिताने परखड मत मांडलं, ‘प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात अशी परिस्थिती येते. स्त्री म्हणून गोष्टी खूप जपाव्या लागतात. पण या सगळ्यात आपला आदर बाजूला ठेवायला लागेल अशा गोष्टीत मी कधीच पडले नाही. इन्स्टंट फेम टिकून राहत नाही. काही रियालिटी शो होते तिथे चुकीच्या गोष्टी ऑफर झाल्या पण माझे वडील सोबत असल्याने मला कधीच या चुकीच्या गोष्टींना मला सामोरं नाही लागलं. मी ऑनस्क्रीन नाही दिसले तरी मी कलाकार नाही असं होत नाही. कधीही चुकीच्या गोष्टीसाठी मी पुढे गेले नाही. मला या चुकीच्या मार्गावर जायचंच नाही यावर मी कायम ठाम होते आणि कायम राहीन. काही गोष्टींची नशा लागते, आयुष्य उद्ध्वस्त होतात. कायम आदराने काम मिळवेन
Exclusive: ‘मासिक पाळी हे महिलेचं दुबळेपण नाही’ आजची दुर्गा जान्हवी तांबटचे परखड मत
बिग बॉसनंतरचं आयुष्य कसं सांभाळलंस यावर रुचिता अत्यंत शांतपणाने आणि समजूतदारपणाने म्हणाली की, ‘सगळ्यांना मी विनंती करते की, जेव्हा तुम्हाला असं काही वाटेल तेव्हा थेरपी घ्या. सायकोलॉजिस्ट मदत घेणं म्हणजे वेड लागणं नाही. तुम्ही नॉर्मल असल्यानंतरही थेरपी घेऊ शकता. माझ्यासाठी हा काळ खूप त्रासदायक होता. त्यानंतर मी गायब होते, माझ्याकडून काय चुका झाल्यात, माझं प्रचंड वजन कमी झालं, माझ्यातला स्पार्क कमी झाला. ३-४ दिवसातून एकदा जेवायचे, २-२ दिवस झोपायचे, रडायला लागले की रडत बसायचे, कोणाशी बोलायचे नाही. घरचे खूपच घाबरले होते. नक्की कोणाकडून मदत घ्यायची कळत नव्हती. इतकी नकारात्मकता होती त्यामुळे नक्की कोणाकडे व्यक्त होऊ तेच कळत नव्हतं. त्यानंतर थेरपी घेतली आणि मित्रमैत्रिणींसमोर रडायचे की ही सर्वात मोठी चूक केली आहे का?
मला जाणवलं की, त्या काळात एक आशेचा किरण मिळणं खूपच गरजेचे असते. त्या काळात सचिन आणि प्राजक्ताने मला मदतीचा हात दिला आणि त्यानंतर मी स्वतःला सावरू लागले. कोणी शिव्या दिल्या म्हणजे तू तशी होत नसते, त्यातून बाहेर पडायला काळ गेला. पण आता मी या सगळ्यातून बाहेर आहे. ग्लॅमरस वर्ल्ड दिसतं तितकंच ते भयानक आहे. बाहेरच्या दुनियेत कलाकारांना स्वतःला लपवून ठेवावं लागतं. ती माझी भीती मी घालवली आहे. मला कधीही कुठलाही मुखवटा चढवायचा नाही. आई-बाबांमध्ये मला दुर्गा दिसते. चुका झाल्यानंतरही आई-बाबा जेव्हा आपल्याबरोबर उभे राहतात ही आपल्यासाठी खूप अभिमानास्पद आहे.’
काय सल्ला देशील मुलींना असं विचारल्यावर ती म्हणाली की, ‘ब्रेक घ्या पण थांबू नका. वास्तू तथास्तु म्हणते. त्यामुळे तुम्ही सकारात्मक रहा. तुमच्यावर विश्वास ठेवणारी लोकंच तुमच्याबरोबर रहा. तुमच्या मार्गावरून हटणार नाही अशाच्या संगतीत रहा. चुकीच्या लोकांची संगत करू नका. काहीही परिस्थिती असेल तरीही काळ बदलतो हे नेहमी लक्षात ठेवा.’ आपल्या रावडीपणाने रुचिताने सर्वांचा निरोप घेत नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या.