Albatya Galbatya: मराठी रंगभूमीवर इतिहास घडला! ‘अलबत्या गलबत्या २.०’चे एकाच दिवशी सलग ७ प्रयोग
Albatya Galbatya: नाटकात नीलेश गोपनारायण यांनी चेटकिणीची, सनीभूषण मुणगेकर यांनी अलबत्या गलबत्याची, तर श्रद्धा हांडे यांनी राजकन्येची भूमिका साकारली. दहा कलाकारांच्या संचाने सलग सात प्रयोगांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
‘अलबत्या गलबत्या’चा सलग सात प्रयोगांचा शिखर विश्वविक्रम
एकाच दिवशी, एकाच संचातील कलाकारांकडून ऐतिहासिक कामगिरी
महापालिका शाळांतील साडेसहा हजार विद्यार्थ्यांना विनामूल्य नाट्यानंद
पुणे/Albatya Galbatya: एकाच दिवशी, एकाच संचातील कलाकारांनी सलग सात प्रयोग सादर करून ‘अलबत्या गलबत्या २.०’ या बालनाट्याने मराठी रंगभूमीवर नवा इतिहास घडविला. बालगंधर्व रंगमंदिरात गुरुवारी (ता. १५) सकाळी सातपासून रात्री सव्वाअकरापर्यंत रंगलेल्या या प्रयोगांची ‘वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया’ने ‘शिखर विश्वविक्रम’ म्हणून नोंद घेतली. या उपक्रमाच्या निमित्ताने पुणे महापालिकेच्या शाळांतील सुमारे साडेसहा हजार विद्यार्थ्यांना विनामूल्य नाटक पाहण्याची संधी मिळाली.
अद्वैत थिएटर निर्मित, रत्नाकर मतकरी लिखित आणि चिन्मय मांडलेकर दिग्दर्शित ‘अलबत्या गलबत्या’ या बालनाट्याने ही कामगिरी केली. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, अद्वैत थिएटरचे निर्माते राहुल भंडारे आणि सर्वस्य प्रोडक्शनच्या निर्मात्या श्रद्धा हांडे यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच पुणे महापालिकेच्या सहकार्याने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करून विश्वविक्रमी प्रयोगांना प्रारंभ झाला. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर आणि उद्यम विकास बँकेच्या उपाध्यक्षा लीना अनास्कर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. दिवसभरात सात प्रयोग सादर करण्यात आले. अखेरचा प्रयोग रात्री पावणेनऊ वाजता सुरू होऊन सव्वाअकरा वाजता संपला. त्यानंतर ‘वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया’च्या वतीने नाटकाच्या संपूर्ण चमूचा प्रेक्षकांसमोर सन्मान करण्यात आला.
या सोहळ्याला महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, महापालिकेच्या सांस्कृतिक व क्रीडा विभागाचे उपायुक्त डॉ. संतोष टेंगळे, बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा नीला शिर्के, सामाजिक कार्यकर्ते अविनाश कांबळे, सुवर्णा थिटे, संदीप विचारे, डॉ. जयंत शेवतेकर, कृष्णा आराणे आदी उपस्थित होते. सुमारे पन्नास वर्षांपूर्वी या नाटकात भूमिका साकारणाऱ्या प्रतिभा मतकरी आणि त्यांच्या कन्या सुप्रिया विनोद यांची उपस्थिती विशेष ठरली.
नाटकाच्या पहिल्या प्रयोगापासून अखेरच्या प्रयोगापर्यंत कलाकारांनी उत्साह आणि ऊर्जा कायम राखली. लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी संपूर्ण चमूचे कौतुक केले. पहिल्या प्रयोगाइतक्याच ऊर्जेने सलग सात प्रयोग सादर करणे, ही सर्व रंगकर्मींसाठी अभिमानास्पद कामगिरी असल्याचे त्यांनी सांगितले.
साडेसहा हजार विद्यार्थ्यांना नाट्यानंद
या विश्वविक्रमी उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महापालिका शाळांतील सुमारे साडेसहा हजार विद्यार्थ्यांना विनामूल्य नाटक पाहण्याची संधी मिळाली. यातील अनेक विद्यार्थ्यांनी प्रथमच नाट्यगृहात प्रवेश केला. या मुलांना रंगभूमीचा आनंद अनुभवता यावा, हा विद्याधर अनास्कर यांचा संकल्प या उपक्रमातून साकार झाला. विद्या बँकेतर्फे विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच बँकेच्या कामकाजाची आणि आर्थिक व्यवहारांची ओळख व्हावी, यासाठी ‘राजू आणि पैशांचे झाड’ हे पुस्तक भेट देण्यात आले.
विश्वविक्रमाच्या निमित्ताने बालगंधर्व रंगमंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. प्रवेशद्वारावरील रांगोळी, फुग्यांची सजावट, सनईचे सूर आणि नाटकाच्या वाटचालीची माहिती देणारी छायाचित्रे यामुळे उत्सवी वातावरण निर्माण झाले होते. नाटकातील गमतीजमती, विनोद आणि कलाकारांच्या अभिनयाला विद्यार्थ्यांनी टाळ्या, शिट्ट्या आणि हास्याच्या गजरात प्रतिसाद दिला.
नाटकात नीलेश गोपनारायण यांनी चेटकिणीची, सनीभूषण मुणगेकर यांनी अलबत्या गलबत्याची, तर श्रद्धा हांडे यांनी राजकन्येची भूमिका साकारली. दहा कलाकारांच्या संचाने सलग सात प्रयोगांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. या विश्वविक्रमी उपक्रमासाठी सचिन गोस्वामी, संजय नार्वेकर, विजय पाटकर, सोनाली कुलकर्णी, प्रसाद ओक, संकर्षण कऱ्हाडे, स्पृहा जोशी, मकरंद अनास्पुरे, नम्रता संभेराव आदी कलाकारांनी शुभेच्छा दिल्या. विविध संस्था, संघटना आणि व्यक्तींच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वी झाल्याचे आयोजकांनी सांगितले.
सलग सात प्रयोगांच्या विश्वविक्रमामुळे मराठी बालरंगभूमीच्या वाटचालीत आणखी एक महत्त्वाचा टप्पा नोंदविला गेला आहे. या कामगिरीनंतर आता ‘अलबत्या गलबत्या’च्या एक हजाराव्या प्रयोगाची उत्सुकता निर्माण झाली आहे.
महापालिकेच्या शाळांतील सुमारे साडेसहा हजार विद्यार्थ्यांना विनामूल्य नाटक पाहण्याची संधी मिळाली. अनेक विद्यार्थ्यांसाठी हा नाट्यगृहातील पहिलाच अनुभव ठरला. बालरंगभूमीचा आनंद सर्वसामान्य कुटुंबांतील मुलांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांना खाऊबरोबरच आर्थिक साक्षरतेचा संदेश देणारे ‘राजू आणि पैशांचे झाड’ हे पुस्तकही भेट देण्यात आले.
Web Title: Albatya galbatya marathi drama one day continue 7 acts entertainment tb