(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Ajinkya Deo: नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ चित्रपट सध्या जोरदार चर्चेत आहे. रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटात मराठी कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसत आहेत. मराठी अभिनेते अजिंक्य देव यांनी या चित्रपटात विश्वामित्र ऋषींची भूमिका साकारली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अजिंक्य देव यांनी ‘रामायण’च्या सेटवरील वातावरण, मुख्य कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव आणि कोणत्या सहकलाकारासोबत त्यांची सर्वाधिक मैत्री झाली, याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
‘रामायण’च्या सेटवरील वातावरणाबद्दल बोलताना अजिंक्य देव यांनी सांगितले की, सेटवर प्रत्येक जण आपल्या कामाबाबत अत्यंत गंभीर आणि समर्पित होता. तिथे अनावश्यक मजा-मस्ती किंवा गोंधळाचे वातावरण नव्हते. दिग्दर्शक नितेश तिवारी सेटवर आल्यावर प्रत्येक शॉटसाठी पूर्णपणे तयार असायचे.
याबद्दल अजिंक्य देव म्हणाले, “सेटवर कोणतीही अनावश्यक मजा-मस्ती नव्हती. कारण जेव्हाही नितेश सर सेटवर यायचे, तेव्हा ते शॉटसाठी पूर्णपणे तयार असायचे. शॉट्सच्या मधल्या वेळेत आम्ही आमच्या पात्रांबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल गप्पा मारायचो. पण आम्ही साकारत असलेल्या पात्रापासून कधीही विचलित झालो नाही.”
विश्वामित्रांच्या लूकसाठी लागायचे दोन तास!
विश्वामित्र ऋषींच्या भूमिकेसाठी अजिंक्य देव यांना विशेष लूक धारण करावा लागला होता. त्यांना दाढी असल्यामुळे तयार होऊन सेटवर पोहोचण्यासाठी साधारण दोन तास लागायचे. सेटवर एसीसह सर्व सुविधा उपलब्ध होत्या. मात्र, एकदा वेशभूषा परिधान केल्यानंतर कलाकारांमध्ये त्यांच्या लूकबद्दलच गप्पा रंगायच्या.
अजिंक्य यांनी सांगितले की, कलाकार एकमेकांना आज कसे दिसत आहोत, व्यायाम केला का, दिवसभरात काय केले, असे प्रश्न विचारायचे. बाकीच्या वेळेत प्रत्येक जण आपापल्या कामावर लक्ष केंद्रित करायचा. संपूर्ण सेटचे वातावरण अतिशय पवित्र होते आणि प्रत्येक गोष्ट करण्यामागे एक प्रकारची शुद्धता होती, असेही त्यांनी सांगितले.
नितेश तिवारींच्या शांत स्वभावाने अजिंक्य देव प्रभावित
दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्यासोबत काम करण्याचा अनुभवही अजिंक्य देव यांनी सांगितला. नितेश तिवारी हे अतिशय शांत आणि संयमी स्वभावाचे असल्याचे त्यांनी म्हटले. सेटवर कधीही आरडाओरडा किंवा गोंधळ नसायचा. त्यामुळे संपूर्ण चित्रीकरणाचा अनुभव खूप छान होता, असे अजिंक्य यांनी सांगितले.
‘रामायण’च्या सेटवर कोणत्या कलाकारासोबत सर्वाधिक चांगले जमले, असा प्रश्न विचारण्यात आला असता अजिंक्य देव यांनी लक्ष्मणाची भूमिका साकारणाऱ्या रवी दुबे यांचे नाव घेतले. रवीसोबत सेटबाहेरही अनेकदा भेटीगाठी झाल्याचे त्यांनी सांगितले.
अजिंक्य म्हणाले, “मला वाटतं की माझं सगळ्यांसोबतच चांगलं जमलं, विशेषतः लक्ष्मण म्हणजेच रवी दुबेसोबत. रवीसोबत आम्ही सेटबाहेरही अनेकदा भेटलो. त्यामुळे आमचं खूप चांगलं जमलं.”
याशिवाय रणबीर कपूर, दिग्दर्शक नितेश तिवारी आणि निर्माता नमित मल्होत्रा यांच्यासोबतही आपले चांगले संबंध असल्याचे अजिंक्य देव यांनी सांगितले. रणबीर कपूर इतर अनेक प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र असल्यामुळे त्याच्या भेटी कमी होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
एकूणच, ‘रामायण’च्या भव्य सेटवरील शिस्तबद्ध वातावरण, कलाकारांमधील मैत्री आणि नितेश तिवारी यांची काम करण्याची पद्धत याबद्दल अजिंक्य देव यांनी दिलेला अनुभव सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.






