(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Kiran Mane: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला. त्यांच्या निधनानंतर अपघातासंदर्भातील अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून, या प्रकरणातील घडामोडींबाबत पारदर्शक माहिती मिळावी, अशी मागणी होत आहे. अशातच अॅड. नितीन यादव यांनी अजित पवार यांच्या शेवटच्या दिवसातील सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे. आता याच मुद्द्यावर मराठी अभिनेते किरण माने यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांच्या या पोस्टची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
किरण माने यांनी आपल्या पोस्टमध्ये मित्र आणि अजित पवार यांचे निष्ठावान कार्यकर्ते असलेल्या अॅड. नितीन यादव यांच्या माहिती अधिकारातील अर्जाचा उल्लेख केला आहे. नितीन यादव यांनी अजित पवार यांच्या शेवटच्या दिवसातील देवगिरी बंगला ते मुंबई विमानतळ आणि विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज मागितले होते. मात्र, संबंधित यंत्रणेकडून हे फुटेज देण्यास नकार देण्यात आल्याचे किरण माने यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
याबाबत त्यांनी लिहिले, ‘माझा जिवलग मित्र आणि अजितदादांचा अतिशय निष्ठावान कार्यकर्ता ॲड. नितीन यादव याने माहिती अधिकारात अजितदादांच्या शेवटच्या दिवसाचे, देवगिरी बंगला ते मुंबई विमानतळ आणि विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज मागितले. व्यवस्थेने ते देण्यासाठी नकार दिला. त्यासाठी दिलेल्या कारणांवरून काही प्रश्न उपस्थित होतात.’

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
किरण माने यांनी या पोस्टमधून थेट सरकारला काही सवाल केले आहेत. उपमुख्यमंत्र्यांचा मृत्यू हा सार्वजनिक हिताचा विषय नसेल, तर सार्वजनिक हिताचा विषय नेमका कोणता, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच सरकारी बंगला, सरकारी गाडी, सरकारी सुरक्षा आणि सरकारी दौरा यामध्ये खासगी काय आहे, असा सवालही त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले, ‘सरकारी बंगला, सरकारी गाडी, सरकारी सुरक्षा आणि सरकारी दौरा. यात ‘खाजगी’ नेमकं काय आहे? ज्यांच्या खाजगीपणाचे कारण तुम्ही देता, ते आज हयात नाहीत. मग तुम्ही नेमका कोणाचा खाजगीपणा जपत आहात?’
सीसीटीव्ही फुटेज अस्तित्वात असल्याचे मान्य केले जात असेल आणि ते पोलिसांना देण्यात आल्याचेही सांगितले जात असेल, तर सर्वसामान्य जनतेला ते दाखवण्यात अडचण काय, असा प्रश्नही त्यांनी विचारला. सत्य स्वच्छ असेल, तर ते लपवण्याची गरज का पडते, असे म्हणत त्यांनी या प्रकरणातील पारदर्शकतेची मागणी केली आहे.
आपल्या पोस्टमध्ये किरण माने यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खरात प्रकरणाचाही उल्लेख केला आहे. या प्रकरणांमधील फोटो, व्हिडीओ आणि सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक झाल्याचा दाखला देत अजित पवार यांच्या प्रकरणातच एवढी गुप्तता का ठेवली जात आहे, असा सवाल त्यांनी केला.
‘असा कोण महत्त्वाचा माणूस अडकला आहे यामागे?’ असा थेट प्रश्न उपस्थित करत त्यांनी या प्रकरणात कोणाला वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे का, अशी शंकाही व्यक्त केली आहे.किरण माने यांनी आपल्या पोस्टमध्ये लोकशाहीचा संदर्भ देत सरकारवर टीका केली आहे. ‘आम्ही आरोप करत नाही. आम्ही फक्त प्रश्न विचारतो. आणि प्रश्नांना उत्तरं देणं ही लोकशाहीत सरकारची जबाबदारी आहे,’ असे त्यांनी म्हटले आहे.
तसेच नुकत्याच झालेल्या ‘लोकतंत्र बचाव’ आंदोलनाचा उल्लेख करत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. ‘वही लोकतंत्र हम बचा रहे है!’ असे म्हणत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर टीका केली. पोस्टच्या शेवटी त्यांनी, ‘क़ातिल ने किस सफ़ाई से धोई है आस्तीं… उसको ख़बर नहीं, कि लहू बोलता भी है!’ या ओळी लिहिल्या आहेत.
किरण माने यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून, अजित पवार यांच्या अपघातासंदर्भातील माहिती आणि सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करण्याच्या मागणीवरून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.






