( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)
Akshaye Khanna:अभिनेता अक्षय खन्ना सध्या यशाच्या शिखरावर असल्याचं पाहायला मिळत आहे. ‘दृश्यम २’, ‘छावा’ आणि ‘धुरंधर’ यांसारख्या चित्रपटांमधून दमदार अभिनयाची छाप पाडल्यानंतर आता अक्षय खन्ना एका वेगळ्याच आणि शक्तिशाली भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘धुरंधर’मध्ये रहमान डकैतची भूमिका साकारल्यानंतर आता तो पौराणिक चित्रपट ‘महाकाली’मध्ये असुरांचे गुरु शुक्राचार्य यांची भूमिका साकारणार आहे.
‘महाकाली’ हा दिग्दर्शक प्रशांत वर्मा यांच्या प्रशांत वर्मा सिनेमॅटिक युनिव्हर्सचा (PVCU) आगामी चित्रपट आहे. या चित्रपटातून अक्षय खन्ना तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार असल्याची माहिती आहे. निर्मात्यांनी चित्रपटाची एक खास झलक २४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार असल्याची घोषणा केली आहे.
चित्रपटाची चर्चा काही दिवसांपूर्वीच सुरू झाली होती. चित्रपट निर्माता प्रशांत वर्मा आणि आरकेडी स्टुडिओने सोशल मीडियावर एक गूढ पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये ‘२४ ऑगस्ट – अंताची सुरुवात’ असं लिहिलं होतं. यासोबतच अक्षय खन्नांचा शुक्राचार्याच्या भूमिकेतील पहिला लूकही समोर आला.
‘महाकाली’मध्ये अक्षय खन्ना असुरांचे शक्तिशाली गुरु शुक्राचार्य यांची भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठी त्याचा लूक पूर्णपणे बदलण्यात आला आहे. समोर आलेल्या फोटोमध्ये अक्षय खन्ना लांब दाढी, विस्कटलेले केस आणि उंच अंबाडा बांधलेल्या अवस्थेत दिसत आहेत. कपाळावरील टिळा, मातीच्या रंगाचे कपडे आणि पारंपरिक दागिने यामुळे त्यांचा लूक अधिकच रौद्र आणि प्रभावी दिसत आहे.
अक्षय खन्नांचा हा अवतार त्याने यापूर्वी साकारलेल्या भूमिकांपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. त्यामुळे पहिला लूक समोर येताच सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
चाहत्यांकडून लूकचं कौतुक
अक्षय खन्नांचा हा नवा लूक समोर आल्यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी त्यांच्या लूकचं आणि भूमिकेचं कौतुक केलं आहे. काही चाहत्यांनी तर हा अवतार अक्षय खन्नांच्या कारकिर्दीतील अविस्मरणीय भूमिकांपैकी एक ठरेल, असा अंदाज व्यक्त केला आहे.
View this post on Instagram
‘महाकाली’मध्ये अक्षय खन्नांसोबत भूमी शेट्टी आणि रोहित सराफ महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. भूमी शेट्टी ही चित्रपटात महाकालीची भूमिका साकारत असल्याची माहिती आहे. काही महिन्यांपूर्वी तिचा लूकही समोर आला होता आणि त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.
‘महाकाली’ हा प्रशांत वर्मा सिनेमॅटिक युनिव्हर्स (PVCU) मधील आगामी चित्रपट आहे. ‘हनु-मॅन’च्या यशानंतर भारतीय पौराणिक कथांना आधुनिक सिनेमॅटिक शैली आणि व्हिज्युअल इफेक्ट्सची जोड देत हे विश्व विस्तारलं जात आहे. त्यामुळे अक्षय खन्नांचा शुक्राचार्याच्या भूमिकेतील हा नवा अवतार प्रेक्षकांसाठी किती खास ठरतो, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.आहे.






