
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
Amaal Mallik: प्रसिद्ध संगीतकार आणि गायक अमाल मलिक याने गुरुवारी एक्सवर एक पोस्ट करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. अमालने आपल्या करिअरबाबत मोठी घोषणा केली असून, पुढील वर्षापर्यंत फिल्मी संगीतापासून ब्रेक घेणार असल्याचं त्याने सांगितलं आहे. अलीकडेच त्याने इमरान हाश्मी, दिशा पाटनी आणि शबाना आझमी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘आवारापन 2’ चित्रपटासाठी ‘ये आवारापन’ हे गाणं संगीतबद्ध केलं होतं.
अमालने एक्सवर एक भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या निर्णयामागची भूमिका स्पष्ट केली. त्याने लिहिलं की, तो सध्या ठीक असून, यावेळी स्वतःसाठी योग्य ते करण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे.
“माझ्या मनासाठी आणि आरोग्यासाठी जे आवश्यक आहे, तेच मला करायचं आहे. माझं मन, शरीर आणि आत्मा पूर्णपणे ठीक होण्यासाठी मला ब्रेकची गरज आहे. स्वतःला सावरण्यासाठी, पुन्हा उभं राहण्यासाठी आणि लवकरच तुमच्यासाठी नव्या सुरांनी भरलेल्या मनाने परतण्यासाठी मला थोडा वेळ हवा आहे,” असं अमालने म्हटलं.
आपल्या चाहत्यांना विनंती करताना अमालने म्हटलं, “कृपया मला आणखी त्रास देऊ नका. मला काही माहिती मिळाली की मी स्वतः तुम्हाला अपडेट करेन.”
आपल्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल बोलताना तो म्हणाला की, संगीतापासून सिनेमापर्यंतचा प्रवास त्याला खूप दूर घेऊन आला. मात्र, आता तो पुन्हा संगीताकडे परतण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
I am all good & I will go all the way in, this time, to do what is best for me & only do what is important to my heart & for my health. Need a break for my mind, body, soul and overall physical healing. Need to rise, recuperate and bounce back soon with a heart full of melodies… pic.twitter.com/nSk0QioC05 — Amaal Mallik (@AmaalMallik) August 27, 2026
अमालने आपल्या पोस्टमध्ये इंडस्ट्रीतील कामाच्या पद्धतीवरही नाराजी व्यक्त केली. गेल्या आठ वर्षांपासून पूर्ण प्रामाणिकपणे आणि कामाच्या काही सन्मानजनक अटींसह काम करण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्याने सांगितलं.
मात्र, या क्षेत्रात तसं होत नसल्याची खंतही त्याने व्यक्त केली. इंडस्ट्रीतील कामकाजाबद्दल सत्य न लपवण्याच्या आपल्या स्वभावामुळे काही लोक नाराज असल्याचं त्याने म्हटलं.
यामुळे त्याला आणि त्याच्या कुटुंबीयांना कथितरित्या अनावश्यक धमक्यांचा सामना करावा लागत असल्याचाही अमालने दावा केला. काही प्रभावशाली लोकांना आपण त्यांच्या किंवा कोणत्याही चित्रपटाचा भाग असू नये, असं वाटत असल्याचं त्याने पोस्टमध्ये म्हटलं.
अमालने पुढे या परिस्थितीला केवळ ‘लेबल्स’चा विषय नसून त्यापेक्षा मोठा मुद्दा असल्याचं म्हटलं. त्याच्या मते, हा अहंकारी लोकांचा एकत्रित दबाव आहे.
अमाल मलिक हा संगीतकार डब्बू मलिक यांचा मुलगा आणि संगीतकार अनु मलिक यांचा पुतण्या आहे. त्याने २०१४ मध्ये सलमान खानच्या ‘जय हो’ या चित्रपटातून संगीतकार म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
यानंतर ‘रॉय’ चित्रपटातील ‘सूरज डूबा है’ या गाण्यामुळे त्याला मोठी ओळख मिळाली. त्यानंतर त्याने ‘हीरो’, ‘एअरलिफ्ट’, ‘कपूर अँड सन्स’, ‘एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी’, ‘कबीर सिंह’ आणि ‘वेदा’ यांसारख्या चित्रपटांसाठी संगीत दिलं.
आता ‘आवारापन 2’साठी संगीत दिल्यानंतर अमालने फिल्मी संगीतापासून ब्रेक घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे त्याच्या या घोषणेनंतर चाहते आणि संगीतप्रेमी त्याच्या पुढील वाटचालीकडे लक्ष ठेवून आहेत.