
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
Bipasha Basu: बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसूसोबत एक धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला असून, त्यात तिने एका प्रोटीन प्रोडक्टबाबत गंभीर दावा केला आहे. तिने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये प्रोटीन शेकमध्ये छोट्या-छोट्या अळ्या दिसत असल्याचं सांगितलं आहे. विशेष म्हणजे, बिपाशाने हा व्हिडिओ महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांना टॅग केला आहे.
बिपाशाने तिच्या सोशल मीडिया स्टोरीमध्ये संबंधित न्यूट्रिशन प्रोडक्टचा व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये ती प्रोटीन पावडरच्या डब्यात छोट्या अळ्या असल्याचं दाखवताना दिसते. तिने आपल्या बोटावर एक छोटी अळीही दाखवली आहे.
बिपाशाने सांगितलं की, हा नुकताच उघडलेला नवीन डबा आहे. तिने व्हिडिओमध्ये संबंधित प्रोटीन पावडरमध्ये अशा छोट्या अळ्या असल्याचा दावा केला आहे.
तुकाराम मुंढेंना थेट टॅग करत मागितली मदत
या प्रकारानंतर बिपाशाने महाराष्ट्र FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांना थेट टॅग करत मदतीची मागणी केली. तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, “तुकारामजी, आम्हाला भेसळयुक्त खाद्यपदार्थ किंवा निकृष्ट दर्जाची उत्पादने मिळत नाहीत, म्हणूनच तुम्ही माझी शेवटची आशा आहात.”
बिपाशाच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावरही या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे.
महाराष्ट्रात सध्या अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत आणि भेसळीविरोधातील कारवाईकडे मोठ्या प्रमाणात लक्ष दिलं जात आहे. महाराष्ट्र FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईसह राज्यातील विविध ठिकाणी हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि खाद्य आस्थापनांची तपासणी सुरू असल्याचं या संदर्भात सांगण्यात आलं आहे.
दूध, चीज यांसारख्या खाद्यपदार्थांमधील भेसळ तसेच नियमांचं उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्यात आली आहे. काही ठिकाणी परवाने निलंबित करण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे.
Mirzapur Box Office Collection: ‘कालीन भैय्या’चा दबदबा कायम! 10 सप्टेंबरला सिनेमाने केली तुफान कमाई
बॉलिवूड कलाकारांकडूनही तुकाराम मुंढेंना पाठिंबा
तुकाराम मुंढे यांच्या कारवाईची दखल बॉलिवूडमधील कलाकारांनीही घेतली आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री प्रीती झिंटाने ‘टीम तुकाराम मुंढे’ असं लिहिलेला टी-शर्ट घालून त्यांना पाठिंबा दर्शवला होता. तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
आता बिपाशा बसूने प्रोटीन प्रोडक्टबाबत केलेल्या दाव्यानंतर तिने थेट तुकाराम मुंढेंकडे मदत मागितल्याने या प्रकरणाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.