( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
‘अडकित्ता’ हे नावही या चित्रपटाला अगदी योग्य आहे. कारण चित्रपटातील पात्रं नाती, जबाबदाऱ्या, विश्वास आणि भावनांच्या अशाच एका गुंतागुंतीत अडकताना दिसतात. ‘मुलाला जन्म देणारी आई मोठी की त्याचं संगोपन करणारी?’ हा प्रश्न चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. मात्र, त्याचबरोबर आईच्या मनातील अपराधीपणाची भावना, मुलाला गमावल्यानंतरचं दुःख आणि पालकत्वातील भावनिक संघर्षही या कथेतून समोर येतो. हा चित्रपट तीन पात्रांच्या भोवती फिरतो गौतम( सिद्धार्थ चांदेकर) कस्तुरी (सखी गोखले) आणि मंगल( सई ताम्हणकर).
चित्रपटाची सुरुवात कस्तुरी आणि गौतम या काम करणाऱ्या जोडप्यापासून होते. दोघंही स्वतंत्र विचारांचे, करिअरला महत्त्व देणारे आणि आपल्या शहरापासून दूर राहणारे आहेत. एका पार्टीदरम्यान कस्तुरीला आपण आई होणार असल्याचं समजतं आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्यात मोठा बदल सुरू होतो.
गर्भावस्थेच्या आठव्या महिन्यात कस्तुरीसमोर मोठं संकट उभं राहतं. तिला जुळी मुलं असल्याचं समजतं; मात्र त्यापैकी एका बाळाचा जन्माआधीच मृत्यू होतो. कस्तुरी आणि दुसऱ्या बाळाच्या जीवाला धोका निर्माण होतो. डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतर दोघांचे प्राण वाचतात आणि कस्तुरी एका मुलाला जन्म देते. त्याचं नाव ओंकार.
मात्र ओंकारच्या जन्मानंतरच कस्तुरी आणि गौतमच्या आयुष्यातील खरी परीक्षा सुरू होते. करिअर आणि पालकत्व यामध्ये समतोल साधताना त्यांना अनेक प्रश्नांचा सामना करावा लागतो. कामाची जबाबदारी सांभाळतानाच बाळाची काळजी घेण्यासाठी त्यांना बाहेरची मदत घ्यावी लागते.
ओंकारची काळजी घेण्यासाठी मंगल त्यांच्या आयुष्यात येते. सुरुवातीला तिची उपस्थिती कस्तुरी आणि गौतमसाठी मोठा आधार ठरते. मात्र, हळूहळू दोघांचा तिच्यावरचा अवलंब वाढत जातो. ओंकार आणि मंगल यांच्यातही जवळीक निर्माण होते.
इथून चित्रपटाची कथा केवळ पालकत्वापुरती मर्यादित राहत नाही. घरात एखाद्या बाहेरच्या व्यक्तीवर आपण किती विश्वास ठेवावा? तिच्यावर अवलंबून राहण्याची एक सीमा असते का? आणि ती सीमा ओलांडली गेली तर नात्यांमध्ये काय बदल होऊ शकतो? असे प्रश्न चित्रपट पुढे घेऊन जातो.
मंगलच्या व्यक्तिमत्त्वात दिसतं त्यापेक्षा बरंच काही दडलं आहे, ही गोष्ट या कथेला वेगळं बनवते. तिच्या आयुष्यातील एक मोठी दुःखद घटना तिच्या स्वभावाला आणखी एक वेगळी बाजू देते. मुलाला गमावल्यानंतर ती कोलमडते, तिचा पतीही तिला सोडून जातो. मात्र या सगळ्यानंतर ती स्वतःला सावरते आणि पुन्हा आयुष्य सुरू करण्याचा प्रयत्न करते.
‘अडकित्ता’ची एक महत्त्वाची बाजू म्हणजे आईच्या भावनांचं चित्रण. नुकतीच आई झालेल्या स्त्रीच्या मनात निर्माण होणारं अपराधीपण असो किंवा आपल्या मुलाला गमावल्यानंतर एका आईला सहन करावं लागणारं दुःख असो, चित्रपट या भावनांकडे गांभीर्याने पाहतो.
मंगल आणि कस्तुरी या दोन स्त्रियांच्या आयुष्यातील परिस्थिती वेगवेगळी असली तरी दोघीही मातृत्वाच्या भावनांशी जोडलेल्या आहेत. त्यामुळे ओंकारसोबत मंगलची वाढती जवळीक कस्तुरीला अस्वस्थ करते. तिच्या मनात निर्माण होणारी असुरक्षितता आणि मंगलशी असलेलं नातं या सगळ्यामुळे घरातील वातावरण बदलत जातं.
‘अडकित्ता’चं दिग्दर्शन आशुतोष निखिल परंधकर यांनी केलं असून, दिग्दर्शक म्हणून हा त्यांचा पहिलाच चित्रपट आहे. चित्रपटात मोठे चढ-उतार किंवा सतत धक्के देणारे प्रसंग नाहीत. तरीही कथा हळूहळू पुढे जाताना प्रेक्षकांना गुंतवून ठेवते.
सई ताम्हणकरची मंगल लक्षात राहते
सई ताम्हणकरने मंगलची भूमिका साकारली आहे. पैशांची गरज असलेली, मनाने दयाळू आणि संवेदनशील स्त्री अशी तिची व्यक्तिरेखा आहे. आयुष्यातील अत्यंत दुःखद प्रसंगाला सामोरं जावं लागूनही ती आपला माणुसकीचा स्वभाव गमावत नाही.
Suraj Chavan New Born Baby: सूरज चव्हाणचं जंगी स्वागत, लेकीनेही दिली खास झलक; व्हिडीओने वेधलं लक्ष
सिद्धार्थ चांदेकरची पडद्यावरील उपस्थिती नेहमीच सहज आणि आपलीशी वाटते. ‘अडकित्ता’मध्ये त्याने पत्नीला साथ देणारा, स्त्री-पुरुष समानतेवर विश्वास ठेवणारा आणि बाळाच्या जन्मानंतर कुटुंबात समतोल राखण्याचा प्रयत्न करणारा गौतम साकारला आहे.
सखी गोखलेने कस्तुरीच्या व्यक्तिरेखेतून नव्या आईच्या मनातील अनेक भावना समोर आणल्या आहेत. आई झाल्यानंतर करिअर, मुलाची जबाबदारी आणि घरातील बदल यांचा ताण तिच्या व्यक्तिरेखेतून जाणवतो. सई ताम्हणकर आणि सखी गोखले यांच्या व्यक्तिरेखा दोन वेगवेगळ्या मातांच्या भावविश्वाकडे पाहण्याची संधी देतात.
संगीतही कथेला साथ देतं
‘अडकित्ता’मध्ये संगीताचाही चांगला वापर करण्यात आला आहे. चित्रपटातील गाणी नायकांच्या भावना आणि कथेतला काळ दाखवण्यास मदत करतात. गाणी शांत आणि भावपूर्ण आहेत.
विश्वासाचा प्रश्न आणि शेवटचा ट्विस्ट
कस्तुरी आणि गौतम एका बातमीनंतर मंगलवर लक्ष ठेवण्यासाठी घरात CCTV लावण्याचा निर्णय घेतात. त्यानंतर गौतम जवळपास महिनाभर मंगलकडे लक्ष ठेवतो. इथून मात्र एक महत्त्वाचा प्रश्न समोर येतो—आपण ज्या व्यक्तीवर आपल्या मुलाची जबाबदारी सोपवली आहे, तिच्यावर आपला विश्वास उरलेला नाही का?
चित्रपट जसजसा शेवटाकडे जातो, तसतशी या नात्यांची गुंतागुंत वाढत जाते. शेवटच्या भागात काहीतरी वेगळं घडतं आणि कथा ज्या दिशेने जाणार असं वाटतं, त्यापेक्षा वेगळं वळण घेते. हा ट्विस्ट सांगणं योग्य ठरणार नाही; तो अनुभवण्यासाठी चित्रपट पाहणं महत्त्वाचं आहे.
Baahubali: ‘बाहुबली’ युनिव्हर्सचा ग्लोबल विस्तार; ड्रीम थिएटरसोबत मोठी पार्टनरशिप
खरं सांगायचं तर ‘अडकित्ता’ प्रत्येक प्रेक्षकाला आवडेलच असं नाही. हा मोठ्या प्रमाणावर मनोरंजन किंवा सतत थरार देणारा चित्रपट नाही. मात्र मानवी भावना, मातृत्व, आईच्या मनातील अपराधीपणाची भावना, मुलाला गमावल्यानंतरचं दुःख, विश्वास आणि नात्यांमधील असुरक्षितता या विषयांकडे प्रामाणिकपणे पाहणारा हा चित्रपट आहे.मोठे ट्विस्ट आणि अतिनाट्य टाळून मानवी नात्यांमधील भावना मांडणारी वेगळी कथा पाहायची असेल, तर ‘अडकित्ता’ला एक संधी देता येईल.






