
फोटो सौजन्य - Social Media
नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे महाराष्ट्र सदन, सरहद (पुणे) आणि महाराष्ट्र परिचय केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘माझे माहेर पंढरी’ या विशेष भक्तीसंध्येला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विठ्ठल नामाच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात उपस्थितांना महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा आणि पंढरपूर वारीच्या सांस्कृतिक वारशाचा अनुभव घेता आला. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी यांच्या सहकार्याने निर्मित ‘पंढरपूर वारी : संतांच्या पाऊलखुणा’ या माहितीपटाचे विशेष स्क्रीनिंगही करण्यात आले.
या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी आणि दिल्लीतील मराठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमामुळे महाराष्ट्र सदन परिसरात जणू पंढरपूरचीच भक्तिमय अनुभूती निर्माण झाली.
भक्तीसंध्येचे प्रमुख आकर्षण ठरल्या त्या काश्मीरमधील प्रसिद्ध गायिका शमिमा अख्तर. त्यांनी ‘माझे माहेर पंढरी’, ‘आजि सोनियाचा दिनू’ आणि ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ यांसह विविध अभंग सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या सुरेल आणि भावपूर्ण सादरीकरणाला श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त दाद दिली.
कार्यक्रमात प्रदर्शित करण्यात आलेला ‘पंढरपूर वारी : संतांच्या पाऊलखुणा’ हा माहितीपट महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा, वारीच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचा वेध घेणारा आहे. हा माहितीपट मराठीसह हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलुगू, बंगाली, कन्नड आणि मल्याळम अशा नऊ भाषांमध्ये तयार करण्यात आला असून, डिस्कव्हरी नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर तसेच सार्क देशांमध्येही प्रसारित केला जाणार आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरहदचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या निवासी आयुक्त डॉ. श्वेता सिंघल, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल आणि अन्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भक्ती, संस्कृती आणि महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा संदेश राजधानी दिल्लीपर्यंत पोहोचवणारा हा सोहळा उपस्थितांच्या कायम स्मरणात राहील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.