(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Sarvagunn Sampanna Movie: झी5 हिंदीने आपल्या दमदार कंटेंट लाइनअपमध्ये आणखी एका वेगळ्या विषयावरील चित्रपटाची भर घालत ‘सरवगुणसंपन्न’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. मॅडॉक फिल्म्सच्या सहकार्याने तयार झालेल्या या चित्रपटात वाणी कपूर आणि इश्वाक सिंह प्रमुख भूमिकेत असून, दिग्दर्शन सोनाली रतन देशमुख यांनी केले आहे.
1990 च्या दशकातील एका छोट्या शहराच्या पार्श्वभूमीवर घडणारा हा चित्रपट एका तरुणीची कथा सांगतो, जिचा चेहरा एका आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रौढ चित्रपट अभिनेत्रीशी साधर्म्य असल्यामुळे समाज तिच्याकडे संशयाच्या नजरेने पाहू लागतो. या पूर्वग्रहांचा तिच्या वैयक्तिक आयुष्यावर, विशेषतः लग्नाच्या शक्यतांवर आणि समाजातील स्वीकारावर परिणाम होतो.
महिलांवर लादल्या जाणाऱ्या सामाजिक अपेक्षा, ओळख, आत्मस्वीकार आणि स्वतःचं व्यक्तिमत्त्व जपण्याचा संघर्ष या विषयांना विनोद, नॉस्टॅल्जिया आणि भावनिक प्रसंगांच्या माध्यमातून चित्रपटात मांडण्यात आलं आहे. रूढ कल्पनांना प्रश्न विचारणारी आणि वेगळा दृष्टिकोन मांडणारी ही कथा प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारी ठरणार आहे.
चित्रपटाविषयी बोलताना वाणी कपूर म्हणाली, “सरवगुणसंपन्नकडे मला सर्वप्रथम आकर्षित करणारी गोष्ट म्हणजे त्याची वेगळी, मनाला भिडणारी आणि आजच्या काळाशी जोडलेली मध्यवर्ती कल्पना. हा चित्रपट आपल्या ओळखीचा, समाज आपल्यावर लादत असलेल्या लेबल्सचा आणि स्वतःचं खरं अस्तित्व शोधण्याच्या प्रवासाचा आहे.”
ती पुढे म्हणाली, “हा विषय अतिशय उबदारपणे, संवेदनशीलतेने आणि हलक्याफुलक्या विनोदातून मांडण्यात आला आहे. त्यामुळे चित्रपट मनोरंजक तर आहेच, पण प्रेक्षकांना विचार करायलाही भाग पाडतो. ताज्या, अर्थपूर्ण आणि प्रत्येकाला आपलीशी वाटणाऱ्या या कथानकाचा भाग असल्याचा मला खूप आनंद आहे.”
वाणी कपूरचा यापूर्वी कधीही न पाहिलेला वेगळा अवतार आणि सामाजिक संदेश देणारं कथानक यामुळे ‘सरवगुणसंपन्न’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक वेगळा अनुभव ठरण्याची शक्यता आहे.






