( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)
Disha Salian Case: दिशा सालियान मृत्यूचं प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. तब्बल सहा वर्षांपूर्वी घडलेल्या या प्रकरणात आता CBIने FIR दाखल केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर केंद्रीय तपास यंत्रणेने या प्रकरणाचा तपास आपल्या हाती घेतला आहे. ताज्या माहितीनुसार, दिशा सालियानचे वडील सतीश सालियान यांनी CBI अधिकाऱ्यांसमोर चार तासांहून अधिक काळ आपला जबाब नोंदवला. ते आपले वकील नीलेश ओझा यांच्यासोबत CBI अधिकाऱ्यांसमोर उपस्थित राहिले होते.
सतीश सालियान यांनी आपल्या मुलीच्या मृत्यूबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यामध्ये त्यांनी दिशावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप केला होता. तसेच काही प्रभावशाली व्यक्ती आणि पोलिस अधिकाऱ्यांवरही त्यांनी गंभीर आरोप केले होते.
मात्र, याचिकेत करण्यात आलेले हे आरोप सध्या तपासाचा विषय आहेत. या आरोपांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही. CBIच्या तपासातून या दाव्यांमध्ये तथ्य आहे की नाही, हे स्पष्ट होणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने 2 सप्टेंबर रोजी CBIला या प्रकरणाचा तपास करून FIR दाखल करण्याचे निर्देश दिले होते. मुंबई क्षेत्रातील CBIच्या संयुक्त संचालकांना अनुभवी आणि वरिष्ठ अधिकाऱ्याची तपास अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यासही न्यायालयाने सांगितलं होतं.
तसंच, तपासातून पुरेसे पुरावे समोर येईपर्यंत कोणत्याही व्यक्तीला आरोपी मानू नये, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं होतं.
दिशा सालियान या सेलिब्रिटी मॅनेजर म्हणून काम करत होती . तिने काही काळ दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्यासोबतही काम केलं होतं. 8 जून 2020 रोजी मुंबईतील मालाड परिसरातील एका उंच इमारतीवरून पडल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला होता.
त्यावेळी मुंबई पोलिसांनी सुरुवातीला या घटनेची अपघाती मृत्यू म्हणून नोंद केली होती. त्यानंतरच्या तपासात आत्महत्येचा निष्कर्ष समोर आला होता. पोलिसांनी या प्रकरणात कोणताही कट किंवा घातपाताचा पुरावा आढळला नसल्याचं म्हटलं होतं.
या प्रकरणात शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे यांचं नावही सतीश सालियान यांच्या याचिकेत नमूद करण्यात आलं होतं. आदित्य ठाकरे यांनी हे आरोप फेटाळून लावत त्यांचा दिशा सालियान यांच्या मृत्यूशी कोणताही संबंध नसल्याचं म्हटलं होतं. तसेच आपली बदनामी करण्याचा हा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
आता CBIने FIR दाखल केल्यामुळे या सहा वर्षे जुन्या प्रकरणाच्या तपासाला नव्याने सुरुवात झाली आहे. दिशा सालियान यांच्या मृत्यूच्या परिस्थितीपासून ते त्या रात्री नेमकं काय घडलं, यासह आतापर्यंत करण्यात आलेल्या विविध दाव्यांची तपास यंत्रणेकडून पडताळणी केली जाणार आहे.
दरम्यान, CBIच्या तपासातून नेमकं काय समोर येतं आणि दिशा सालियान यांच्या मृत्यूचं गूढ उकलतं का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.






