फोटो सौजन्य सोशल मीडिया
२०२६ च्या मध्यावधी निवडणुकीत डेमोक्रॅट्सनी प्रतिनिधीगृह आणि सिनेट या दोन्ही सभागृहांमध्ये विजय मिळवला. विशेष म्हणजे, पारंपरिकपणे रिपब्लिकन पक्षाचा प्रभाव असलेल्या काही राज्यांमध्येही डेमोक्रॅट्सनी मोठे यश मिळवले. कॅन्सस, दक्षिण कॅरोलिना आणि टेक्साससारख्या राज्यांतील निकालांनी राजकीय समीकरणे बदलली आहेत. या विजयामुळे डेमोक्रॅट्सना ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयांवर नियंत्रण ठेवण्याची आणि महत्त्वाच्या विधेयकांना अडवण्याची ताकद मिळणार आहे.
निवडणुकीतील पराभवानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना, आपण निवडणुकीच्या रिंगणात असतो तर रिपब्लिकन पक्षाने प्रचंड बहुमताने विजय मिळवला असता, असा दावा केला. आपण उमेदवार नसल्यामुळे पक्षाचा पराभव झाला, असे संकेत त्यांच्या वक्तव्यातून मिळाले.
मात्र, त्यांनी निवडणुकीचा निकाल स्वीकारण्याची तयारी दर्शवली आणि डेमोक्रॅट्सचे अभिनंदनही केले. दुसरीकडे, रिपब्लिकन पक्षातील काही समर्थकांनी या पराभवासाठी ट्रम्प यांच्या धोरणांना जबाबदार धरले आहे.
Sweden News : होलोकॉस्ट नाकारणे आता ठरणार गुन्हा; स्वीडनच्या संसदेत घटनादुरुस्ती मंजूर
या निवडणुकीत इराण युद्ध, वाढती महागाई, इंधनाचे दर आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढलेल्या किमती हे महत्त्वाचे मुद्दे ठरले. युद्धामुळे अमेरिकेतील नागरिकांवर आर्थिक भार वाढल्याची भावना मतदारांमध्ये होती. ट्रम्प यांनीही इराण युद्धाचा रिपब्लिकन पक्षाच्या पराभवात काही प्रमाणात वाटा असल्याचे मान्य केले. मात्र, इराणविरोधात घेतलेला निर्णय योग्य असल्याचे सांगत त्यांनी आपल्या भूमिकेचे समर्थन केले.
डेमोक्रॅट्सच्या या विजयामुळे आता अमेरिकेतील सत्तासंतुलन बदलणार आहे. नव्या सभागृहात ट्रम्प प्रशासनाच्या कारभाराची चौकशी, आर्थिक निर्णयांवर नियंत्रण आणि महत्त्वाच्या धोरणांवर विरोध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्या उर्वरित कार्यकाळात व्हाइट हाऊस आणि काँग्रेस यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.






