
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Don’t Be Shy Jhoomo Song: यंग-एडल्ट प्रेक्षकांसाठी खास तयार करण्यात आलेल्या आगामी चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. प्राइम व्हिडिओच्या ‘डोंट बी शाय’ या चित्रपटातील पहिलं गाणं ‘झूमो’ नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे. मस्ती, मैत्री, संगीत आणि जबरदस्त बीट्सने भरलेलं हे गाणं रिलीज होताच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे.
टी-सीरिज प्रस्तुत ‘झूमो’ हे गाणं साहिल आणि जोनिता गांधी यांनी आपल्या दमदार आवाजात गायलं आहे. राम संपत यांनी या गाण्याला संगीत दिलं असून, राम संपत आणि देवांश वैद्य यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत. हाय-एनर्जी बीट्स, रंगीबेरंगी दृश्यं, कमाल कोरिओग्राफी आणि रेट्रो-स्टाइल फॅशन यामुळे ‘झूमो’ हा एक धमाकेदार पार्टी ट्रॅक ठरला आहे.
‘डोंट बी शाय’ ही मैत्री, क्रश आणि मोठं होण्याच्या प्रवासाची कहाणी आहे. चित्रपटाच्या म्युझिकल प्रवासाची सुरुवात ‘झूमो’ या गाण्याने करण्यात आली असून, गाण्यातील बेफिकीर मजा, मित्रांसोबतचे सेलिब्रेशन आणि तरुणाईचा उत्साह विशेष भावतो. ‘कमिंग-ऑफ-एज’ कथेला साजेसा उत्साही मूड या गाण्यात पाहायला मिळतो.
गाण्याचे संगीतकार आणि गीतकार राम संपत यांनी ‘झूमो’बद्दल आपला अनुभव सांगितला. त्यांच्या मते, छोट्या-छोट्या क्षणांमधील आनंद साजरा करणाऱ्या गाण्याची कल्पना करण्यात आली होती. गाण्यात एनर्जी आणि रिदमिक क्वालिटी असावी, ते कॅची वाटावं आणि ‘डोंट बी शाय’च्या खोडकर दुनियेशीही जोडलेलं असावं, अशी टीमची इच्छा होती.
गाण्यातील कलाकारांनी दाखवलेली एनर्जी आणि त्यांच्यातील उत्तम केमिस्ट्रीमुळे ट्रॅकचा मूड आणखी खुलला. त्यांच्या उत्साहामुळे गाण्यात जीव आला असून, ‘झूमो’ तयार करण्याचा संपूर्ण अनुभव खूप मजेदार ठरल्याचं राम संपत यांनी सांगितलं.
‘डोंट बी शाय’ची कथा श्यामिली ‘शाय’ दास या २० वर्षीय मुलीभोवती फिरते. आपलं आयुष्य योग्य दिशेने सुरू आहे, असं शायला वाटत असतं. मात्र, अचानक तिच्या आयुष्यात असं काही घडतं, ज्याची तिने कल्पनाही केलेली नसते. तिच्या हातात असलेल्या गोष्टी हळूहळू निसटू लागतात आणि परिस्थिती तिच्या नियंत्रणाबाहेर जाऊ लागते.
आरुषी बजाज, अंश दुग्गल, बियांका अरोरा आणि पीयूष खाती यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात कुणाल रॉय कपूर, अनुराग बसू, नेहा धूपिया आणि अंजू अल्वा नाईक हे देखील महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन श्रीती मुखर्जी यांनी केलं आहे. आलिया भट्ट आणि शाहीन भट्ट यांच्या ‘इटर्नल सनशाइन प्रोडक्शंस’ या बॅनरखाली चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. ‘चॉकबोर्ड एंटरटेनमेंट’च्या ग्रीष्मा शाह आणि विकेश भूटानी हे या चित्रपटाचे सह-निर्माते आहेत.
‘डोंट बी शाय’ हा चित्रपट २५ सप्टेंबर २०२६ रोजी भारतासह जगभरातील २४० हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये प्राइम व्हिडिओवर रिलीज होणार आहे. हा चित्रपट खास हिंदी भाषेत इंग्लिश सबटायटल्ससह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.