
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Edits Film Festival: मुंबईत एडिट्स फिल्म फेस्टिव्हलची ऑगस्ट महिन्यात सुरूवात झाली होती. या 45 दिवसांच्या उपक्रमाची सांगता झाली आहे. या फेस्टिव्हलमध्ये उत्कृष्ट स्टोरीटेलिंग आणि कंटेंट एडिटिंगसाठी एडिट्सचा प्रभावी वापर करणाऱ्या क्रिएटर्सचा गौरव करण्यात आला. इशांक गुप्ता (@filmmaker.ishank), सान्या रोहिल्ला (@bunniestbunnytoeverbunny) आणि अहसान वझीर (@ahsan_vazir__) यांनी आपल्या सर्जनशील कलाकृतींच्या जोरावर विजेतेपद पटकावले. या कार्यक्रमाला चित्रपट निर्माती फराह खान, फेस्टिव्हलचे परीक्षक अहसास चन्ना, डॉली सिंग, निखिल तनेजा आणि राजीव मसंद यांच्यासह १०० हून अधिक कंटेंट क्रिएटर्स उपस्थित होते.
‘एडिट्स फिल्म फेस्टिव्हल’साठी ऑगस्ट महिन्यात सबमिशन्सना सुरुवात झाली होती. ४५ दिवसांच्या या उपक्रमात सहभागी क्रिएटर्सना त्यांच्या कॅमेरा रोलमधील न एडिट केलेल्या व्हिडिओंचा वापर करून स्वतःचा कंटेंट तयार करण्याचे आवाहन करण्यात आले होते. यासाठी इंस्टाग्रामच्या ‘एडिट्स’ या व्हिडिओ एडिटिंग अॅपचा वापर करणे आवश्यक होते.
फेस्टिव्हलमध्ये निवडण्यात आलेल्या कलाकृतींनी या संकल्पनेतील सर्जनशील शक्यता दाखवून दिल्या. विशेषतः परीक्षकांनी निवडलेल्या पहिल्या तीन कलाकृतींमध्ये धाडस, संयम आणि संपादन कौशल्य यांचा प्रभावी मिलाफ पाहायला मिळाला. वेगवेगळ्या कथाकथन शैली आणि एडिटिंगच्या वैशिष्ट्यपूर्ण वापरामुळे इशांक गुप्ता, सान्या रोहिल्ला आणि अहसान वझीर यांच्या कलाकृतींनी विशेष लक्ष वेधून घेतले.
या विजेत्यांची निवड अहसास चन्ना, डॉली सिंग, निखिल तनेजा आणि राजीव मसंद या परीक्षकांनी केली.
क्रिएटर्सना नव्या प्रयोगांसाठी प्रोत्साहन
मेटा इंडियाचे हेड ऑफ ग्लोबल पार्टनरशिप्स अंकित रिहाल यांनी या उपक्रमाबद्दल आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, “क्रिएटर्सना योग्य टूल्स, प्लॅटफॉर्म्स आणि संधी उपलब्ध करून देणे हे आमच्या कामाच्या केंद्रस्थानी आहे. या फेस्टिव्हलमुळे नवीन सर्जनशील शक्यता खुल्या झाल्या आणि क्रिएटर्सना त्यांनी यापूर्वी न वापरलेल्या फीचर्ससह प्रयोग करण्यासाठी तसेच नव्या पद्धतीने कथा सांगण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. आमच्या ज्युरी सदस्यांचे तसेच फराह खान यांचे आम्ही आभारी आहोत. त्यांनी त्यांच्या स्टोरीटेलिंगच्या प्रवासातील अमूल्य अनुभव आणि दृष्टिकोन आमच्यासोबत शेअर केला.”
या फेस्टिव्हलमध्ये चित्रपट निर्माती फराह खान विशेष अतिथी म्हणून सहभागी झाल्या होत्या. चित्रपट निर्मितीपासून ते सोशल मीडियावरील ऑनलाइन कंटेंटपर्यंतचा त्यांचा अनुभव उपस्थितांसाठी महत्त्वाचा ठरला. थिएटरसाठी फीचर फिल्म्स तयार करताना आणि सोशल मीडियासाठी रील्स बनवताना कथाकथनाची शैली कशी बदलते, याविषयी त्यांनी आपले विचार मांडले.
सोशल मीडियावरील पोस्ट्सच्या नियोजनाबाबत बोलताना फराह खान म्हणाल्या, “लोकांना वाटतं की माझ्या प्रत्येक पोस्टमागे एखादा मोठा प्लॅन असतो, पण मी काय पोस्ट करते याचा फारसा विचार करत बसत नाही. जनरेशन Z ने मला खूप प्रेरणा दिली आहे. ते याबाबतीत खूपच सहज असतात, कोणताही दुसरा विचार न करता. मग तो माझ्या शोमधला एखादा क्लिप असो, एखादी सहज झालेली गप्पा असो किंवा क्षणात सुचलेली एखादी खोडकर कल्पना असो, माझ्यासाठी सगळंच अगदी स्पॉन्टेनियस असतं. मला वाटतं की रिलेटेबिलिटी, रिअलनेस आणि त्यासोबत थोडासा ह्युमर, यालाच इंस्टाग्रामवरील प्रेक्षक खऱ्या अर्थाने प्रतिसाद देतात.”
डिजिटल माध्यमांमध्ये सहजता, वास्तवाशी नातं सांगणारा आशय आणि विनोद यांचं महत्त्व फराह खान यांच्या संवादातून अधोरेखित झालं. क्रिएटर्सना नव्या कल्पना मांडण्यासाठी आणि संपादनाच्या वेगवेगळ्या पद्धतींचा प्रयोग करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा फेस्टिव्हल सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणारा उपक्रम ठरला.