
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Janak Marathi Movie Teaser: मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या वेगवेगळ्या विषयांवरचे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यातच मराठी अभिनेत्री सायली संजीव आणि अविनाश नारकर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘जनक’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्या बापाने लेकीवर आयुष्यभर आभाळाएवढं प्रेम केलं, त्याच बापाच्या सन्मानावर जेव्हा प्रश्नचिन्ह उभं राहतं, तेव्हा त्याच्यासाठी न्यायालयात लढणारी लेक… नात्यांची भावनिक गुंफण, स्वाभिमानाची लढाई आणि न्यायालयातील उत्कंठावर्धक संघर्ष यांची झलक दाखवणाऱ्या ‘जनक’ या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या टीझरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, चित्रपटाबद्दलची उत्सुकताही वाढली आहे.
अभिषेक कंवर दिग्दर्शित आणि आर टी बी फिल्म्स प्रस्तुत ‘जनक’ हा सत्यघटनेवर आधारित कोर्टरूम थ्रिलर आहे. बाप-लेकीच्या नात्याची ताकद अधोरेखित करतानाच, आरोपांच्या सावटाखाली सापडलेल्या वडिलांचा सन्मान वाचवण्यासाठी लेक कशी उभी राहते, याची झलक टीझरमध्ये पाहायला मिळते. एका बाजूला आरोपांचं वादळ, तर दुसऱ्या बाजूला सत्यासाठी आणि वडिलांच्या स्वाभिमानासाठी सर्वस्व पणाला लावणारी मुलगी, अशा संघर्षातून चित्रपटाची कथा उलगडणार आहे.
या चित्रपटात सायली संजीव एका गर्भवती महिलेच्या भूमिकेत दिसत आहे. तिच्या व्यक्तिरेखेचा वेगळा पैलू टीझरमधून समोर आला असून, वडिलांच्या सन्मानासाठी लढणाऱ्या मुलीची भावनिक घालमेल आणि तिची जिद्द लक्ष वेधून घेते. वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यासोबतच वडिलांसाठी न्याय मिळवण्याची जबाबदारी पेलणाऱ्या या व्यक्तिरेखेमुळे कथेला वेगळी भावनिक खोली मिळण्याची अपेक्षा आहे.
दुसरीकडे, अविनाश नारकर यांची भूमिका आणि अभिनयही टीझरमधील लक्षवेधी बाब ठरते. सायली संजीव आणि सुरेश विश्वकर्मा यांच्यात रंगणारा कोर्टरूम ड्रामा चित्रपटातील न्यायालयीन संघर्षाला महत्त्वाचं वळण देणार असल्याची झलक पाहायला मिळते. त्यामुळे न्यायालयात नेमकं काय घडणार आणि या संघर्षाचा शेवट कोणत्या दिशेने जाणार, याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
दमदार टीमची साथ
‘जनक’च्या दिग्दर्शनाची जबाबदारी अभिषेक कंवर यांनी सांभाळली आहे. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद ओंकार भसमे यांचे आहेत. त्रिलोक सिंग राजपूत यांनी असोसिएट प्रोड्युसर, तर सुजीत मुकाटे यांनी कार्यकारी निर्माते म्हणून योगदान दिलं आहे. चित्रपटाला आदित्य कडताने यांनी संगीत दिलं आहे.
वडिलांवरील आरोप, त्यांच्या सन्मानासाठी लढणारी मुलगी आणि सत्याच्या शोधात सुरू असलेला न्यायालयीन संघर्ष या सगळ्यामुळे ‘जनक’च्या टीझरने चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवली आहे. न्यायाचा विजय होणार की आरोपांच्या सावटाखाली एका बापाचा स्वाभिमान हरवणार, याचं उत्तर चित्रपट पाहिल्यानंतरच मिळणार आहे.
अभिषेक कंवर दिग्दर्शित आणि आर टी बी फिल्म्स प्रस्तुत ‘जनक’ हा कोर्टरूम थ्रिलर १३ नोव्हेंबर २०२६ पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.