
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Eetha Trailer Out: बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आगामी ‘ईठा’ हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. प्रसिद्ध लावणीसम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. नुकताच चित्रपटातील रणदीप हुड्डा यांचा ‘मर्चंट’ या भूमिकेतील लूक प्रदर्शित करण्यात आला होता. त्यानंतर आता निर्मात्यांनी प्रेक्षकांना आणखी एक खास सरप्राईज दिलं आहे. बहुप्रतीक्षित ‘ईठा’चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर रिलीज झाला आहे.
ट्रेलरच्या सुरुवातीला एका खुल्या मैदानात जमलेली प्रचंड गर्दी पाहायला मिळते. मंचावर ईठा लावणी सादर करताना दिसते. तिच्या नृत्यातील विविध छटा, प्रेक्षकांचा उत्साह आणि बदलणारे लूक यामुळे सुरुवातीपासूनच ट्रेलरमध्ये एक वेगळी ऊर्जा जाणवते. श्रद्धा कपूरने साकारलेल्या ईठाच्या भूमिकेची झलक या दृश्यांमधून पाहायला मिळते.
“माझा विश्वासच माझा अहंकार होता!”
ट्रेलरमध्ये पुढे ईठाचा संघर्ष आणि तिच्या आयुष्यातील भावनिक घडामोडी समोर येतात. एका प्रसंगात ती म्हणते, “तूच म्हणाला होतास ना की बघूयात काय तुटतं? माझा विश्वास की माझा अहंकार?” यानंतर ती स्वतःच्याच पोस्टरवर दगड मारताना दिसते. या दृश्यात अभिनेता सिद्धार्थ जाधवचीही झलक पाहायला मिळते.
पुढील एका दृश्यात मंचासमोर मोठी गर्दी दिसते. घुंगरू बांधलेले पाय आणि त्यावर दिसणारे रक्त या दृश्यातून ईठाच्या संघर्षाची तीव्रता जाणवते. याच वेळी श्रद्धाच्या तोंडी असलेला संवाद लक्ष वेधून घेतो. ती म्हणते, “माझा विश्वासच माझा अहंकार होता. जेव्हा तो तुटला तेव्हा सगळंच तुटलं.”
Actor Heart Attack: ‘हुंकार: द रोअर’च्या शूटिंगपूर्वी ‘या’ अभिनेत्याला आला होता हृदयविकाराचा झटका, दिग्दर्शकाने केला खुलासा
“नाचता नाचता मेले तर एक आदर्श होईन!”
ट्रेलरमध्ये ईठाच्या आयुष्यातील कठीण प्रसंग, संघर्ष आणि लावणीशी असलेलं तिचं नातं दाखवण्यात आलं आहे. अनेक अडचणींचा सामना करतानाही नृत्यावरील तिचं प्रेम कायम असल्याचं पाहायला मिळतं. “नाचता नाचता मेले तर एक आदर्श होईन,” हा तिचा संवाद विशेष लक्षवेधी ठरतो. या संवादातून विठाबाईंच्या जिद्दीची आणि कलेप्रती असलेल्या समर्पणाची झलक पाहायला मिळते.
लक्ष्मण उतेकर यांच्या दिग्दर्शनाखाली साकारतोय ‘ईठा’
‘ईठा’ या चित्रपटाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर करत आहेत. श्रद्धा कपूर प्रमुख भूमिकेत असून रणदीप हुड्डा ‘मर्चंट’च्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात सिद्धार्थ जाधव, शुभंकर एकबोटे आणि राधा सागर यांच्यासह अनेक मराठी कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत.
ट्रेलरमधील दमदार संवाद, लावणीचे सादरीकरण आणि विठाबाईंच्या संघर्षाची झलक यामुळे ‘ईठा’बद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. आता मोठ्या पडद्यावर श्रद्धा कपूर विठाबाई नारायणगावकर यांची भूमिका कशा प्रकारे साकारते, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
लावणीसम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या आयुष्यावर आधारित ‘ईठा’ हा चित्रपट येत्या ४ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विठाबाईंच्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्ती, त्यांचा संघर्ष आणि कलेच्या क्षेत्रातील त्यांचा प्रवास या चित्रपटातून उलगडणार आहे. रणदीप हुड्डा यांचा ‘मर्चंट’ या भूमिकेतील लूक समोर आल्यानंतर चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. आता ट्रेलरमधील दमदार दृश्यांनंतर प्रेक्षकांना चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रतीक्षा आहे.