
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)
Ganeshotsav 2026: गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून मान्यता मिळाल्यानंतर यंदा प्रथमच गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबईकरांना शास्त्रीय संगीताची विशेष मेजवानी अनुभवता येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे ‘गणेशोत्सव २०२६ शास्त्रीय संगीत महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. हा आठवडाभराचा संगीत महोत्सव १७ ते २४ सप्टेंबर २०२६ दरम्यान प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिराच्या मिनी थिएटरमध्ये रंगणार आहे.
दररोज सायंकाळी ६.३० वाजता होणाऱ्या या महोत्सवात विविध नामवंत कलाकार गायन आणि वादन सादर करणार आहेत. अभिजात शास्त्रीय संगीताची परंपरा जतन करणे, तिचे संवर्धन करणे आणि नव्या पिढीपर्यंत ती पोहोचवणे हा या महोत्सवाचा प्रमुख उद्देश आहे.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी, १७ सप्टेंबरला सुभद्रा देसाई गायन सादर करणार असून एस. आकाश आणि मेहताब अली नियाझी यांचे बासरी-सतार युगल वादन होणार आहे.
१८ सप्टेंबरला स्वर शर्मा आणि अनुजा झोकरकर यांचे गायन, तर १९ सप्टेंबरला नूपुर गाडगीळ आणि नागेश आडगावकर यांच्या गायनाची मैफल रंगणार आहे.
२० सप्टेंबरला मृणालिनी देसाई रुद्रवीणेचे सादरीकरण करणार असून गंधार देशपांडे गायन सादर करतील. तर २१ सप्टेंबरला यज्ञेश रायकर व्हायोलिन वादन आणि प्राजक्ता मराठे गायन सादर करणार आहेत.
२२ सप्टेंबरला धनंजय हेगडे यांच्या गायनासोबत यशवंत वैष्णव आणि सुखद मुंडे यांचे तबला-पखवाज युगल वादन होणार आहे. २३ सप्टेंबरला विनय रामदासन गायन, तर अभिषेक बोरकर सरोद वादन सादर करतील.
महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी, २४ सप्टेंबरला केदार केळकर यांच्या गायनासोबत अपूर्वा गोखले आणि पल्लवी जोशी यांचे युगल गायन होणार आहे.
मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये पूर्वी शास्त्रीय गायन-वादनाच्या मैफली, नाट्यसंगीत, भावसंगीत आणि व्याख्यानमाला यांसारखे सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर आयोजित केले जात होते. १९६० ते १९८० या काळात नामवंत कलाकारांचे सादरीकरण उत्सवाच्या निमित्ताने सर्वसामान्य रसिकांना ऐकता येत असे.
मात्र पुढील काळात चित्रपटसंगीत, ऑर्केस्ट्रा आणि डीजे यांचा प्रभाव वाढल्याने गणेशोत्सवातील अभिजात संगीताचे प्रमाण कमी झाले. राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानंतर या जुन्या सांस्कृतिक परंपरेला नव्याने उजाळा देण्याचा प्रयत्न या महोत्सवाच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
प्रवेश निःशुल्क
या महोत्सवाचे सूत्रसंचालन राणी वर्मा करणार असून, नियोजन आणि संकलन शशी व्यास, संचालक आणि संस्थापक, पंचम निषाद यांनी केले आहे.
हा सांस्कृतिक उपक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे.
‘गणेशोत्सव २०२६ शास्त्रीय संगीत महोत्सवा’साठी प्रवेश निःशुल्क आहे. मुंबई आणि परिसरातील संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आठवडाभर चालणाऱ्या संगीत महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.